- मनपा

खड्ड्यांची समस्या पूर्णत: सुटावी यासंदर्भात कार्यवाही करा मनपाच्या विशेष सभेत महापौरांचे निर्देश

नागपूर, ता. २७ : नागपूर शहरातील रस्त्यांची स्थिती वाईट आहे. खड्ड्यांमुळे अनेक भागात नागरिकांना असुविधा निर्माण होत आहे व अपघाताचाही धोका निर्माण झाला आहे. मागील दीड वर्षामध्ये कोरोनाचे संकट आणि सततचे पाउस यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या वाढल्याचे प्रशासनाकडून मान्य करण्यात आले आहे. अशा स्थितीत शहरातील खड्डे बुजविण्याच्या कार्याला गती देणे आवश्यक आहे. प्रशासनाने खड्डे बुजविण्यासंदर्भात जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. झोनची जबाबदारी निश्चित करून पुढे खड्ड्यांची समस्या उद्भवू नये, संपूर्ण खड्डे बुजविले जावे यासंदर्भात कार्यवाही करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

            सोमवारी (ता.२७) मनपाची विशेष सभा घेण्यात आली. सभेमध्ये मनपा प्रशासनाने २० मार्च २०२१पासून शहरातील नागरिकांना द्यावयाच्या मुलभूत सुविधा जसे सार्वजनिक रस्ते व त्यावरील खड्ड्यांची सुस्थिती व दुरुस्ती, पर्यावरण संरक्षण नागरी वनीकरण, जल मलनि:स्सारण, पावसाळी सांडपाणी नि:स्सारण अशी बहुविध विकासकामे प्रलंबित असण्याची कारणे यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती महापौर दयाशंकर तिवारी यांनी उपरोक्त निर्देश दिले. याशिवाय सभेमध्ये मनपाद्वारे करण्यात येणारे कार्य व मनपाचा आर्थिक उत्पन्नाचा अहवाल या विषयांवरही चर्चा झाली.

            प्रशासनाद्वारे माहिती देताना सांगितले की, पावसाळा संपताच रस्त्यांवरील खड्डे दुरूस्ती करण्याचे नियोजन प्रशासनाद्वारे करण्यात आले असून या संदर्भातील नियोजनासंदर्भात मनपा व नासुप्रच्या हॉट मिक्स प्लाँटकडून डांबरी मिक्स खरेदी करून पावसाळा संपताच ४५ दिवसाच्या आत दुरूस्तीचे नियोजन करण्यात आले आहे. मनपा मुख्यालयातील अभियंत्यांद्वारे झोननिहाय खड्ड्यांची पाहणी करून शहरातील मुख्य रस्त्यांवरील ६० हजार चौरस मीटर खड्डे भरणे आवश्यक असल्याचे निष्कर्ष काढले. त्यानुसार हॉट मिक्स विभागाद्वारे २७ हजार चौरस मीटर नासुप्र हॉटमिक्स विभागाकडून डांबरी मिक्स घेउन सुमारे २४ हजार चौरस मीटर खड्डे भरण्याचे व उर्वरित खड्डे जेट पॅचर व इन्स्टा पॅचरद्वारे भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खड्डे बुजविण्यासाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये १७.८१ कोटी प्रावधान केले होते त्यापैकी ४.६८ कोटी खर्च झाले. तर २०२१-२२ या चालू वर्षामध्ये १७ कोटीचे प्रावधान असून आतापर्यंत २.४४ कोटीचे काम झालेले असल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली.

            नागपूर शहरातील रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचे कार्य मनपातर्फे करण्यात येत आहे. शहरात महानगरपालिकेसह अन्य विभागाच्या अखत्यारितील रस्ते आहेत. या सर्व रस्त्यांवर किती खड्डे आहेत यासंबंधी संपूर्ण माहिती सभागृहामध्ये सादर करून खड्डे बुजविण्यासंदर्भात मनपाच्या अर्थसंकल्पात सुधारणा करून निधी वाढविण्यात यावा, असे निर्देश महापौरांनी दिले. प्रशासनाने जबाबदारी निश्चित करून खड्डे बुजविण्याचे कार्य पावसाळ्यापूर्वीच व्हावे यासंबंधी पुढील नियोजन करावे. याशिवाय खड्डे बुजविताना राहिलेले मिलिंग मटेरियल तिथेच पडून न ठेवता तो हॉटमिक्समध्ये डम्प केला जावा. यामुळे डांबर आणि गिट्टीचा सुद्धा खर्च वाचेल व आर्थिक बचत होईल, असेही महापौरांनी सूचित केले. खड्डे बुजविण्याचे कार्य जलदगतीने व्हावे यासंबंधी प्रशासनाने कर्मचा-यांनी रविवारी सुद्धा काम करावे असे नियोजन करावे यासंबंधी सर्व झोनस्तरावर नियोजन करावे. तसेच खड्डे बुजविण्यासंदर्भात पुढील वर्षापासून अशी स्थिती उद्भवू नये यादृष्टीनेही नियोजन करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

            सभेमध्ये प्रशासनाद्वारे आर्थिक उत्पन्नाचा विभागनिहाय विस्तृत अहवाल सभागृहापुढे सादर करण्यात आला.

 

महापौरांनी दिलेले महत्वाचे निर्देश

–     सिवर लाईन सुधारण्यासंदर्भात योग्य नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी

–     दोन वर्षापासून बंद असलेल्या सिवर लाईनच्या कामाची निविदा प्रक्रिया झाली असून तात्काळ कार्यादेश देण्यात यावे

–     सिवर लाईनचे अत्यावश्यक कामे प्राधान्याने करण्यात यावे

–     मनपाचे निविदा एकत्र न काढता प्रभाग निहाय काढल्यास काम लवकर पूर्ण होईल जास्त लोकांना काम मिळेल, यासंबंधी कार्यवाही करणे

–     तयार रस्त्यावर खड्डे पडल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करणे

–     टॉवर, बॅनर, आठवडी बाजार, पार्कींग आदींद्वारे उत्पन्न वाढीकडे विशेष लक्ष देणे

–     विकास कार्याला गतीशिलता देण्यासाठी स्थायी समिती, दुर्बल घटक समिती व अन्य स्त्रोतांचे निविदांचे कार्यादेश लवकर काढणे

–     प्रलंबित फाईल लवकरात लवकर मार्गी लावा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *