- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपूर समाचार : ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’च्या स्वरात निनादला दीक्षाभूमी परिसर; इंदोरा, संविधान चौक, विमानतळ परिसरात बुद्धवंदना

नागपूर समाचार : शांती, करुणा आणि मैत्रीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची 2570 वी जयंती दीक्षाभूमी येथे शुक्रवारी (१ मे) सकाळी उत्साहात साजरी करण्यात आली. स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी उपस्थितांना त्रिशरण आणि पंचशील दिले. यावेळी बुद्धम् शरणम् गच्छामिच्या स्वरात दीक्षाभूमी परिसर निनादून गेला होता. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी, भिक्खु संघ, भिक्खुनी संघ आणि अखिल भारतीय धम्म सेना यांच्या संयुक्त विद्यमाने भदंत ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षाभूमी येथे बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित भिक्खु संघाने बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला वंदन केले. यावेळी भदंत ससाई यांनी बुद्धाचा कल्याणाचा मार्ग या विषयावर मार्गदर्शन केले.

जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. बुद्धाचे विचार अंगीकारल्यास निश्चितच प्रगती आहे, असेही ससाई म्हणाले. याप्रसंगी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, एन. आर. सुटे, विलास गजघाटे,‌ आनंद फुलझले, प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर उपस्थित होत्या.

तत्पूर्वी भदंत ससाई यांच्या उपस्थितीत इंदोरा बुद्ध विहारातून निघालेल्या मिरवणुकीत बौद्ध उपासक-उपासिका पांढरे वस्त्र परिधान करून सहभागी झाल्या होत्या. यावेळी पंचशील ध्वज लक्ष वेधून घेत होते. ससाई यांनी इंदोरा बुद्ध विहार, इंदोरा चौक, संविधान चौक आणि विमानतळ परिसरातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थितांना त्रिशरण आणि पंचशील दिले.

यावेळी भंते नागसेन, धम्मविजय, धम्मप्रकाश, नागवंश, अश्वजीत, भिक्खुनी संघप्रिया, कुंडलिका, अनोमा, सुमेधा, सुपवासा, करुणादिप,विशाखा, शीलानंद, चित्तबोधी यांच्यासह धम्म सेनेचे नन्हा सावाईथुल, अशोक गोवर्धन, अमन मेश्राम, धीरज बोरकर, आर्यन सवाईथुल, अमोल भैसारे, बादल राऊत, प्रशांत चव्हाण, दिनेश चंद्रिकापुरे, विनीत घरडे, आशु सोनारे, विनोद रामटेके, उत्तम इंदूरकर, नितीन नंदागवळी,अमोल जनबंधू आदी उपस्थित होते.