- मनपा

मनपातर्फे हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षणाला सुरुवात,नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

नागपूर, ता. २७ : शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे २००४ पासून हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेद्वारे शहरातील हत्तीरोगाचे प्रमाण किती प्रमाणात कमी झाले याची शहानिशा करण्यासाठी सोमवार (ता. २७) पासून हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. सदर सर्वेक्षण ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी मनपा शिक्षणाधिकारी, झोनल वैद्यकिय अधिकारी आणि मनपा, साथरोग अधिकारी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन मनपा वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी केले आहे.  

            केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार मागील 3 वर्षांपासून  ज्या जिल्हयातील हत्तीरोग दर सर्व ठिकाणी एक टक्केपेक्षा कमी आढळला आहे, अशा जिल्ह्यात सार्वत्रिक औषधोपचार मोहिम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील हत्तीरोग दुरिकरणाच्या अंतीम टप्यात असलेल्या सहा जिल्हयांमध्ये नागपूरचाही समावेश आहे. त्यामुळे सदर मोहिम बंद करण्यापूर्वी शहरातील रँडम स्पॉट (Random Spot) मध्ये रात्रकालीन हत्तीरोग सर्वेक्षणात रक्त दूषितांचे प्रमाण एक टक्केपेक्षा कमी असल्याची खातरजमा केल्यानंतर आता मनपा हद्दीत ‘समुदाय संक्रमण पडताळणी सर्वेक्षण’ हे विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. सदर सर्वेक्षण केवळ ६ ते ७ वर्ष वयोगटातील मुलांमध्ये करण्यात येत आहे.

 

याच वयात का?

            मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन (MAD)/ट्रिपल ड्रग थेरेपी (IDA) सुरू झाल्यानंतर जन्मलेल्या मुलांच्या रक्तामध्ये हत्तीरोगाचे जंतू विशिष्ट प्रमाणापेक्षा अधिक आढळणे म्हणजे क्रियाशील हत्तीरोग संक्रमणाची खुण होय. तसेच हत्तीरोग आजाराचा प्राथमिक संसर्ग ६ ते ७ वयोगटातील मुलांमध्ये आढळून येत असल्यामुळे या मुलांची निवड करण्यात आली आहे.

            सर्वेक्षणासाठी निवड झालेल्या सर्व वस्तीतील रँडम पद्धतीने मुला-मुलींची निवड करण्यात आलेली असून शासनाच्या निर्देशानुसार सर्व कोव्हिड-१९ प्रोटोकॉलचे पालन करून रक्तनमुने तपासण्यात येणार आहेत. तरी आपल्या घरी येणाऱ्या मनपा आरोग्य विभागाच्या चमूला रक्त नमुने घेण्यास मदत करा आणि हत्तीरोग दुरीकरणासाठी सहकार्य करा, असे आवाहन मनपातर्फे  करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *