- मनपा

क्षयरोग बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे निदान व उपचार प्रकल्पाचा शुभारंभ मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले ऑनलाईन पद्धतीने ई-लाँचींग

नागपूर, ता. ३ : टी.बी. मुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्या निदान व उपचारासाठी केंद्रीय क्षयरोग विभाग भारत सरकार, क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम नागपूर शहर व ग्रामीण, शेयर इंडिया, सी.डी.सी. अटलांटा यांच्या संयुक्त विद्यमाने व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सहकार्याने लॅटेन्ट टीबी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा मंगळवारी (ता.३) मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ केला.

            मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत येथे स्थित आयुक्त सभागृहामध्ये यासंबंधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मेयोच्या अधिष्ठाता डॉ.भावना सोनावणे,  मनपाचे  वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, मुख्य संशोधक व क्षयरोग विभाग प्रमुख डॉ. राधा मुंजे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. इनामदार, शहर क्षयरोग अधिकारी  डॉ.  शिल्पा जिचकार, शेयर इंडीया संस्थेचे प्रमुख डॉ. विजय येलदंडी, डॉ. सतीश कैपलीवार, प्रकल्प समन्वयक डॉ.तक्षशीला ताकसांडे, लक्ष्मण शिंदे, डेटा मॅनेजर स्वेच्छा चामर्शी आदी उपस्थित होते. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ममता सोनसरे, सीडीसी अटलांटाचे डॉ. क्रिस्टीन व  सीडीसी  इंडियाचे डॉ. राजेश देशमुख यांनी ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली.

            कोव्हिड नियमांचे पालन करीत ऑनलाईन पद्धतीने स्क्रीनवरील डिजीटल फित कापून मनपा आयुक्तांनी प्रकल्पाचे ई-लॉचींग केले. यावेळी बोलताना आयुक्त म्हणाले, क्षयरोग प्रतिबंध व उपचाराच्या दृष्टीने उत्तम प्रकल्प असून या माध्यमातून क्षयरुग्णाच्या संपर्कात येणा-या व्यक्तींचे वेळीच निदान होउन त्यांना आवश्यक ते औषधोपचार मिळू शकणार आहे. सदर कार्यक्रम क्षयरोग निर्मूलनाच्या दृष्टीने महत्वाचा असून यासंबंधी आवश्यक ते सर्व सहकार्य मनपातर्फे करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.

            प्रकल्पाची संकल्पना विषद करताना मुख्य संशोधक व क्षयरोग विभाग प्रमुख डॉ. राधा मुंजे यांनी सांगितले की, सदर प्रकल्पाद्वारे क्षयरुग्णाच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक ते सर्व औधोपचार केले जाणार आहेत. नागपूर शहरामध्ये प्रकल्पाचे चार केंद्र राहणार असून ग्रामिण भागामध्ये चार केंद्र असतील. शहरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), इंदिरा गांधी रुग्णालय मनपा,  पाचपावली  सूतिकागृह,  शांतीनगर  नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील भिवापूर, उमरेड, हिंगणा, कामठी येथील टीबी यूनिट अंतर्गत येणा-या क्षयरोगबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे लॅटेन्ट टीबी प्रकल्पांतर्गत निदान व उपचार केले जाणार आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *