- नागपुर समाचार

कोरोनाविरुद्ध एकजुटीने लढा देऊया ‘कोव्हिड संवाद’मध्ये डॉ.मिलिंद भृशुंडी व डॉ. दिनेश अग्रवाल यांचे आवाहन

नागपूर समाचार : कोरोनामुळे देशभरातील स्थिती पुन्हा एकदा संकटात आहे. देशात नागपूर शहरात दुस-या क्रमांकावर सर्वाधिक कोरोनाबाधित आहेत. ही धोक्याची बाब आहे. मागील वर्षभरापासून मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, सॅनिटायजरचा वापर करणे आदी नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र आज ही स्थिती आपण नियमांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे उद्भवलेली आहे. त्यामुळे या संकटातून बाहेर निघण्यासाठी आतातरी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे. मास्क हा लढाईतील मोठा योद्धा आहे. तो कधीही विसरू नका. सर्वांनी नियमांचे पालन करून एकजुटीने कोरोनाविरुद्ध लढा देऊया व जिंकून स्वत:सह आपल्या परिवाराचेही रक्षण करूया, असे आवाहन एचआयव्ही कन्सल्टंट तथा टास्क फोर्स कमिटीचे सदस्य डॉ. मिलिंद भृशुंडी व पॅथॉलॉजिस्ट तथा आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने सुरू करण्यात आलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. एचआयव्ही कन्सल्टंट तथा टास्क फोर्स कमिटीचे सदस्य डॉ. मिलिंद भृशुंडी व पॅथॉलॉजिस्ट तथा आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश अग्रवाल यांनी गुरूवारी (ता.२५) ‘कोव्हिड संवाद’मध्ये ‘कोव्हिड-१९ आता पुढे काय?’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देउन त्यांनी शंकांचे निराकरण सुद्धा केले.

वर्षभरापूर्वी अशाच पद्धतीने नागपूर शहरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती सोबतच मृत्यूदरही वाढला होता. मात्र त्यावेळी गंभीर आजार असलेल्या रुग्णांच्याच मृत्यूची नोंद झाली होती. मात्र यावेळी जास्तीत जास्त तरुण यामध्ये बळी पडत आहेत. हे केवळ तरुणाईच्या दुर्लक्षामुळेच होत आहे. त्यामुळे कोरोनाकडे दुर्लक्ष करू नका, मास्क व्यवस्थित वापरा. फक्त कारवाईपासून वाचण्यासाठी मास्क लावू नका. त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन करा, कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट येण्याचे वेळ देउ नका, असेही आवाहन डॉ. मिलिंद भृशुंडी व डॉ. दिनेश अग्रवाल यांनी केले.

आज आपल्याकडे ‘कोव्हिशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ अशा दोन लस उपलब्ध आहेत. दोन्ही लस पूर्णपणे सुरक्षित असून लस घेणे आवश्यक आहे. लस हा पूर्णपणे कोव्हिडवरील उपाय नाही, मात्र लस घेतल्यानंतर पुढे कोव्हिड झाल्यास तो सौम्य स्वरूपातच राहिल, गंभीर रूप धारण करणार नाही. त्यामुळे लस घेण्यासाठी पुढे या, असे आवाहन डॉ. मिलिंद भृशुंडी यांनी यावेळी केले.

एखाद्याने चाचणी केली व ती पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेच दुसरी चाचणी ही निगेटिव्ह येत असल्याचीही तक्रार नेहमी मांडली जाते. कोरोनाची चाचणी ही जर पॉझिटिव्ह असेल तर रुग्ण १०० टक्के पॉझिटिव्ह आहे व जर चाचणी निगेटिव्ह असेल तर तो रुग्ण पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. त्यामुळे चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास १७ दिवसांचे आयसोलेशन पूर्ण करा, निगेटिव्ह रिपोर्ट दाखवून स्वत:चीच फसवणूक करून धोका निर्माण करू नका, असे डॉ. दिनेश अग्रवाल यांनी आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *