- Breaking News, नागपुर समाचार

कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी खाटांच्या उपलब्धतेची एकत्र माहिती द्या – डॉ. संजीव कुमार

* कोविड उपाययोजना व आरोग्य सुविधांचा आढावा

* मेडिकलमध्ये 90 अतिरिक्त खाटांची सुविधा

* मेघे रुग्णालयात आयसीयूसह अतिरिक्त खाटा

* ऑक्सिजनचे दोन अतिरिक्त टँकर मागविणार

* कोरोनासंबंधित आरटीपीसीआर तपासण्या वाढवा

नागपूर समाचार : नवीन कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे नागपूरसह विभागातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये अतिरिक्त खाटांची व्यवस्था करुन उपलब्ध असलेल्या खाटांची एकत्रित माहिती नागरिकांना उपलब्ध करुन दिल्यास रुग्णांची गैरसोय होणार नाही, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिले.

कोरोनासंदर्भात नागपूर शहरासह विभागात राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना तसेच बाधित रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधांचा आढावा विभागीय आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला.

बैठकीत महात्मा गांधी ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे आयुक्त शंतनु गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप गोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख, माहिती संचालक हेमराज बागुल, उद्योग सहसंचालक श्री. धर्माधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपूर विभागात 2 लाख 85 हजार 497 बाधित रुग्णांपैकी 2 लाख 41 हजार 680 रुग्ण बरे झालेले आहेत. सद्य:स्थितीत 5 हजार 284 रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी नागपूर जिल्ह्यात 3 हजार 856 रुग्ण भरती आहेत. त्यात वर्धा-342, भंडारा-156, गोंदिया-103, चंद्रपूर-524 तर गडचिरोली जिल्ह्यातील 293 रुग्णांचा समावेश आहे. नागपूर शहर व जिल्ह्यात रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे विविध रुग्णालयात भरती असलेले रुग्ण व रिक्त असलेल्या खाटा याची एकत्रित माहिती नागरिकांना दिल्यास कोविड रुग्णांची गैरसोय होणार नाही. महापालिकेतर्फे शहरातील सर्व रुग्णालयांमधील उपलब्ध व्यवस्थेबद्दलची माहिती संकलित करावी, असे निर्देश डॉ. संजीव कुमार यांनी दिले.

शासकीय रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय व एम्समध्ये भरती असलेल्या रुग्णांना महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ अनुज्ञेय असल्यामुळे या योजनेतून कोविड रुग्णांना लाभासंदर्भातील प्रकरणे तात्काळ सादर करावीत, असे निर्देश देताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 5 हजार 945 पैकी 2 हजार 732 प्रकरणे सादर झाली आहेत. तसेच इंदिरा गांधी वैद्यकीय 1 हजार 427 प्रकरणांपैकी 1 हजार 990 प्रकरणे सादर झाली असून इतरही प्रकरणे प्राधान्याने सादर करुन रुग्णांना यो योजनेचा लाभ मिळवून द्यावा. अशा सूचना यावेळी केल्या.

नागपूर जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढते असून त्याप्रमाणात तपासणी मोहीम महापालिका व जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. बाधित रुग्णांची सरासरी 31.35 टक्के या प्रमाणात आहे. कोरोनाबाधित रुग्णासोबत त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची तपासणी मोहीम राबवण्यासोबतच ज्या परिसरात रुग्णवाढीचे प्रमाण जास्त आहे. अशा परिसरात तात्काळ कठोर निर्बंध लागू करावे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना वेळेवर औषध व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. बाधित रुग्ण बाहेर फिरणार नाही याची दक्षता घेवून कठोर कारवाई करावी. असेही बैठकीत सांगण्यात आले.

नागपूर जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात सरासरी आयसीयू नसलेले एक हजार खाटा तसेच खासगी रुग्णालयात 2 हजार 367 खाटा उपलब्ध आहेत. आयसीयूसह शासकीय रुग्णालयात 380 तर खासगी रुग्णालयात 818 खाटा उपलब्ध असून यामध्ये शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालय तसेच मेडिकल कॉलेजमध्ये अतिरिक्त 90 खाटांची वाढ होत आहे. रुग्णांच्या संख्येनुसार खासगी रुग्णालयामध्येही खाटांच्या संख्येत वाढ करावी, अशा सूचना यावेळी बैठकीत करण्यात आल्या.

नागपूर जिल्ह्यासह विभागासाठी भिलाई स्टिल प्लँट येथून दररोज ऑक्सिजन टँकर उपलब्ध होत आहेत. यामध्ये वाढ करुन अतिरिक्त दोन टँकर उपलब्ध करुन देण्यासंबंधी संबंधित कंपनीला प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. अकोला व नांदेडसाठी पुण्यावरुन ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्यामुळे नागपूर विभागासाठी मागणीनुसार ऑक्सिजन उपलब्ध होवू शकेल. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजन वापरावर निर्बंध आणून 80 टक्के ऑक्सिजन आरोग्य सेवेसाठी तर 20 टक्के ऑक्सिजन उद्योगासाठी वापरण्यासंबंधी निर्देश जाहीर करावे, अशा सूचना डॉ. संजीव कुमार यांनी बैठकीत दिल्यात.

नागपूर विभागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत 60 वर्षांवरील नागरिक तसेच 45 वर्षांपर्यंतच्या आजारी रुग्णांना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत 1 लाख 75 हजार 912 लसीकरणाचे डोस देण्यात आले असून 64 टक्क्यांपेक्षा पत्र नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी लसीकरण केंद्राची वाढ करण्यात आली असून नागपूर जिल्ह्यात दररोज दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त लसीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. जयस्वाल यांनी बैठकीत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *