
सुरक्षित आणि स्वस्त प्रवासाकरता मेट्रोचा वापर करा, नागपूरकरांना केले आवाहन
नागपूर : सुरक्षेच्या सर्व उपाय योजनांसह सुरु असलेल्या नागपूर मेट्रोला शहरावासीयांचा योग्य प्रतिसाद मिळतो आहे. एकीकडे मेट्रो तर्फे प्रवाश्यांकरता विविध सोइ-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतानाच, दुसरीकडे नागपूरचे सन्माननीय लोक प्रतिनिधी देखील मेट्रोने प्रवास करत असून या निमित्ताने मेट्रोच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती घेत आहेत.
याच शृंखलेत दक्षिण नागपूर विधान सभा मतदार संघाचे आमदार मा. श्री मोहन मते यांनी आज सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर आणि परत अशी मेट्रोची राईड केली. श्री मते यांच्या सोबत सुमारे ७५ कार्यकर्ते देखील या राईड मध्ये सहभागी होते. या आधी मध्य नागपूर विधान सभा मतदार संघाचे आमदार मा. श्री. विकास कुंभारे, माजी आमदार, मा. प्रो. जोगेंद्र कवाडे आणि मा. श्री. प्रकाश गजभिये यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसह मेट्रोने राईड केली होती.
आजचा मेट्रोचा प्रवास आपल्या करता अतिशय उपयुक्त आणि सुखकर असल्याचे मत श्री मते यांनी प्रवासा दरम्यान व्यक्त केले. नागपूरकरांकरता सर्वच दृष्टीने एक सुरक्षित प्रवासाचे साधन महा मेट्रो असून, प्रवासाच्या सुरवातीपासूनच या संबंधी सर्व खबरदारी घेतली जात असल्याचे ते म्हणाले. रस्त्याने प्रवास करताना होणारा त्रास, मेट्रोने करताना होत नाहीच, शिवाय यात सर्व सोइ सुविधांचा लाभ देखील प्रत्येकाला घेता येतो, असे देखील ते म्हणाले. शिवाय प्रवासी भाडे अतिशय कमी असून, नागपूरकरांनी मेट्रोचा वापर करावा असे आवाहन देखील त्यांनी केले.