- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : राष्ट्रीय जंतनाशक दिवस 13 फेब्रुवारीला

नागपूर समाचार : जिल्हयातील 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुले व मुली यांचे आरोग्य चांगले ठेवणे ही आरोग्य विभागाची जबाबदारी असून नागपूर जिल्हयात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम 13 फेब्रुवारीला राबविण्यात येणार आहे. 20 फेब्रुवारी मॉप अप दिन म्हणून राबविणार आहे. दरवर्षी प्रमाणे सन 2023-24 मध्ये 1 ते 19 वर्षे वयोगटातील राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेसाठी एकूण 5 लाख 50 हजार 36 लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.

नागपूर जिल्ह्यामध्ये आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व एकात्मिक बालविकास विभाग, पाणी पुरवठा या मुख्य विभागांनी एकत्र येऊन जंतनाशक मोहिम यशस्वीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

पालकांनी आपल्या मुलांचे जंताच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करावे व राष्ट्रीय जंतनाशक 13 फेब्रुवारी रोजी मुलांना जंतनाशक गोळी खाऊ घालण्यासाठी व मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

केन्द्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार किशोरवयीन आरोग्य कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय जंतनाशक मोहीम वर्षातून दोन वेळा राबविण्यात येते. या मोहिमेमध्ये 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुले व मुलींना जंतनाशक मोहिमेंतर्गत जंतनाशकाची एक गोळी खाऊ घालण्यात येते. आतड्यांमधील कृमी दोष हा बालकांमध्ये व किशोरवयीन मुला मुलींमध्ये होणाऱ्या रक्तक्षय व कुपोषणास मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. यामुळे मुला-मुलींच्या शिक्षणावर व पुढील आयुष्यावर याचा विपरित परिणाम होतो. तीव्र प्रमाणात कृमी दोष असलेले विदयार्थी हे बऱ्याचदा आजारी असतात, त्यांना लवकर थकवा येतो व अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करु शकत नाही. यामुळे ते बऱ्याचदा शाळेत अनुपस्थित असतात. आतडयांमधील कृमी दोष याचा प्रसार बालकांमध्ये दुषित मातीव्दारे सहजतेने होतो. शाळा व अंगणवाडी पातळीवरुन देण्यात येणारी जंतनाशक गोळी ही फार परिणामकारक आहे. या मोहिमेचा उद्देश 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुले व मुली यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषणस्थिती शिक्षण व दर्जा उंचावणे हा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *