नागपुर समाचार : विद्यार्थ्यांनी काही विशेष कामगिरी करणे ही कुठल्याही शाळेसाठी भूषणावहच ठरते. शाळेला अशा विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक वाटते. असाच एक कौतुकसोहळा स्थानिक पं. बच्छराज व्यास विद्यालयाने आयोजिला आहे.
राजाबाक्षा, मेडिकल चौकाजवळील पं. बच्छराज व्यास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. शर्वरी कोमजवारने शालांत परीक्षेत उत्तम यश मिळवल्यावर पुढे संगणकीय विज्ञानात पदवी घेतली. उच्चशिक्षणासाठी मात्र तिने अमेरिकेत जाण्याचे ठरवले. तेथे जाण्यासाठी द्यावी लागणारी प्रवेशपरीक्षा व इतर सोपस्कार तिने पूर्ण केले. अमेरिकेत शर्वरीने ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास’ मधून ‘एम.एस.’ केल्यावर न थांबता ‘पीएच.डी.’ ची तयारी सुरू केली. अलिकडेच तिला टेक्सास युनिव्हर्सिटीने ‘डॉक्टरेट’ देऊन सन्मानित केले.
सध्या डॉ.शर्वरी तेथील एका मोठ्या कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत आहेतिचा, डॉ. शर्वरी कोमजवारने नृत्याची आवड असल्याने शिक्षणासोबतच भरतनाट्यमचे प्रशिक्षण अमेरिकेतच डॉ. श्रीधरा अक्किहेब्बालू या नृत्यगुरूंकडून घेतले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तेथेच तिचा ‘अरंगेत्रम’ कार्यक्रम झाला व नृत्याचे जाहीर कार्यक्रम करण्याची स्वायत्तता शर्वरीला मिळाली. सौ. रोहिणी व डॉ. रवींद्र कोमजवार या दाम्पत्याची ही गुणी मुलगी.
आपल्या विद्यार्थिनीची अशी यशस्वी वाटचाल बघून प. बच्छराज व्यास विद्यालयाने डॉ. शर्वरीचा कौतुकसोहळा व भरतनाट्यम् नृत्याचे आयोजन नववर्षारंभी म्हणजे ३ जानेवारी २०२३ ला सकाळी ८ वा. कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे केले आहे.
कार्यक्रमास ‘संस्कार भारती’ च्या अध्यक्षा सौ. कांचनताई गडकरी व ‘राष्ट्रसेविका समिती’ च्या प्रमुख संचालिका आदरणीय शांताक्का उपस्थित राहणार आहेत, असे मुख्याध्यापिका सौ. अर्चना जोशींनी कळविले आहे.