- मनपा

क्रीडा क्षेत्रात मनपाचे नाव मोठे करण्यासाठी प्रयत्न करणार क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने यांचे प्रतिपादन : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

नागपूर, ता. २९ : आज ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ खेळाकरिता खूप मोठा दिवस आहे. दिवसेंदिवस शहरात तरुण पिढीमध्ये खेळाचे महत्व खूप वाढले आहे. यासाठी नागपूर महानगरपालिका सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. पुढेही क्रीडा क्षेत्रात मनपाचे नाव मोठे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मनपा क्रीडा समितीचे सभापती प्रमोद तभाने केले.

रविवारी (ता. २९) मनपा मुख्यालयातील क्रीडा समिती सभापती कक्षात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीप्रीत्यर्थ मनपाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने आणि उपसभापती लखन येरेवार यांनी मेजर ध्यानचंद यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी क्रीडा समितीचे सदस्य प्रमोद कौरती, शेषराव गोतमारे, उपायुक्त विजय देशमुख, क्रीडा नियंत्रक अधिकारी नितीन भोळे आणि क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, क्रीडा क्षेत्रात मेजर ध्यानचंद यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न मिळण्यासाठी मनपातर्फे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच क्रीडा क्षेत्राला प्राध्यान देत मनपाचे क्रीडा धोरण पारित केले असल्याचेही त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले.

नागपूर शहरामध्ये विविध खेळांमध्ये चांगले क्रीडापटू घडावेत यादृष्टीने मनपाद्वारे आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी उपायुक्त विजय देशमुख म्हणाले. प्रतिभा असून केवळ परिस्थितीमुळे मागे राहणा-या खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देत त्यांना संधी मिळवून देण्यात येईल. शहरामध्ये खेळासाठी पोषक वातावरण निर्मिती करून त्यातून उत्तम खेळाडू घडावेत यासाठी सुद्धा पुढेही मनपा प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर यांनी केले. आभार क्रीडा नियंत्रक अधिकारी नितीन भोळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *