- मनपा

खेळाडूवृत्ती जपून सदैव देशासाठी समर्पीत व्यक्तीमत्व मेजर ध्यानचंद : महापौर दयाशंकर तिवारी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या म्यूरलचे लोकार्पण

नागपूर, ता. २९ : १९३६मध्ये बर्लीन ऑलिम्पिकमध्ये भारताला न भूतो न भविष्यती असा विजय मिळवून देत हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांनी इतिहास घडविला. याविजयानंतर जर्मनीचा हुकूमशाह ॲडॉल्फ हिटलरने मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या देशाकडून खेळल्यास सेनेमध्ये वरीष्ठ पद बहाल करण्याचे आमिष दाखविले. स्वत:च्या देशात एक हवालदार बनून आयुष्यवर सेवा करणार पण देशाशी बेईमानी करणार नाही असे ठणकावून सांगत आपल्या क्रीडा निष्ठेसह देशनिष्ठेची धैर्याने प्रचिती देणारे मेजर ध्यानचंद यांनी सीमेवर बलीदान देउनच देशसेवा केली जाउ शकते असे नाही तर आपल्या कृतीतूनही देशासाठी आयुष्य अर्पीत करता येते याची प्रचिती दिली. एकूणच खेळाडूवृत्ती जपून सदैव देशासाठी आयुष्य समर्पीत केलेले व्यक्तीमत्व मेजर ध्यानचंद आहेत, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेतर्फे नगरसेवक किशोर जिचकार यांच्या विशेष प्रयत्नाने साकार झालेल्या हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या म्यूरलचे रविवारी (ता.२९) विदर्भ हॉकी असोसिएशनच्या मैदानाच्या दर्शनी भागात महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विदर्भ हॉकी असोसिएशनचे प्रशासक त्रिलोकनाथ सिध्रा, मनपाचे क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेवक सर्वश्री किशोर जिचकार, संजय बंगाले, नगरसेविका रुपा राय, उज्ज्वला शर्मा, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, शहरातील क्रीडा संघटक विजय बारसे, नरेंद्र जिचकार, हरीश कपूर, सतीश फुलसुंगे, विवेक सिरीया, घनशाम मांगे, नवीन नायडू, इंदू ठाकुर, गजानन मालकर आदी उपस्थित होते.

 

पुढे बोलताना महापौर म्हणाले, आज आपण सर्व आपल्या अधिका-याच्या लढाईमध्ये एवढे व्यस्त झालोत की आपले कर्तव्य विसरून गेले आहोत. मेजर ध्यानचंद यांनी आपल्या कर्तव्यापासून कधीही कसूर केले नाही. आज आपण प्रत्येकच जण आपल्या जबाबदारीच्या कृतीतून देशाप्रती आपले योगदान देउ शकतो. आपल्या परिसराची स्वच्छता, इतरांच्या दु:खात मदत, सहकार्य आणि सहयोग ही सुद्घा देशसेवा आहे. मेजर ध्यानचंद यांनी या सर्व गोष्टींसह आपले खेळ, खेळाडू आणि खिलाडूवृत्ती जपले म्हणूनच आज जगात हॉकीचा उल्लेख होताच मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. हॉकीचे जादूगार म्हणून ख्याती असलेले मेजर ध्यानदंच यांच्या आकर्षक म्यूरलचे लोकार्पण करण्याची संधी मिळणे हे भाग्य आहे. व्हीएचवर खेळणा-या प्रत्येक खेळाडूला प्रेरणा देणारी ही बाब ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

मनपाच्या विद्यार्थ्यांना व्हीएचए मध्ये प्रशिक्षण द्या

नागपूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आहे. त्यांना केवळ योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे मनपाच्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना विदर्भ हॉकी असोसिएशनद्वारे हॉकीचे प्रशिक्षण देण्यात यावे. यासाठी लागणारी आवश्यक मदत मनपाद्वारे करण्यात येईल, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले. विदर्भ हॉकी असोसिएशनच्या मैदानावर गवत वाढले असल्याने येथे खेळाडूंचा सराव बंद आहे. खेळाडूंच्या सरावामध्ये अडचण निर्माण होउ नये यासाठी येथील गवत साफ करून देण्यात यावे अशी मागणी योवळी व्हीएचए प्रशासनामार्फत करण्यात आली. यावर दखल घेत मैदानावरील गवत तात्काळ साफ करण्याबाबत महापौरांनी धरमपेठ झोनच्या सहायक आयुक्तांना निर्देश दिले.

 

ॲस्ट्रोटर्फसाठी प्रयत्न करणार

विदर्भ हॉकी असोसिएशनच्या मैदानावर ॲस्ट्रोटर्फ लावण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ॲस्ट्रोटर्फ लागल्यास आपल्या शहरातील, विदर्भातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. सदर प्रलंबित विषय राज्यशासनाकडून मंजुर करण्यास नगरसेवक किशोर जिचकार यांनी प्रयत्न करावेत. पुढे केंद्राकडे विषय आल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांच्याशी संवाद साधून ॲस्ट्रोटर्फ करिता निधी मंजूर करून घेण्यास पूर्ण प्रयत्न करणार, अशी ग्वाहीही यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.

 

खेळाडूंकडे संग्रही असलेल्या फोटोंमधून म्यूरल साकार

प्रास्ताविकामध्ये नगरसेवक किशोर जिचकार यांनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे म्यूरल साकार करण्याची संकल्पना विषद केली. विदर्भ हॉकी असोसिएशनच्या मैदानावर सराव करणा-या खेळाडूंकडे संग्रही मेजर ध्यानचंद यांचे अनेक फोटो होते. या सर्व फोटोंचा संग्रह करून त्यातून आकर्षक म्यूरल साकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मेजर ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार यांनी म्यूरलच्या सुंदर कलाकृतीबद्दल फोनवरून अभिनंदन केल्याचेही त्यांनी सांगितले.

मेजर ध्यानचंद यांचे आकर्षक म्यूरल साकारणारे नागपूरकर कलाकार सागर पराते व कामाचे कंत्राटदार जावेद खान यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ.नम्रता पांडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *