- Breaking News, नागपुर समाचार, मनपा, शिक्षा

नागपुर समाचार : मनपाच्या ५० शाळांमध्ये ड्रीमकॅचर्स २०२५ उपक्रमांची सुरूवात

मनपा शाळांमध्ये सामाजिक भावनात्मक शिक्षणाचा उपक्रम राबविणार

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकांच्या ५० शाळांमध्ये या वर्षांपासून सामाजिक भावनात्मक शिक्षणाचा (एसईएल) उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिका व रेनवातीओ या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. उपक्रमाची सुरूवात शनिवारी (ता.२) चिटणवीस सेंटरच्या मीमांसा सभागृह येथे करण्यात आली.

यावेळी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., वेस्टर्न कोलफिल्डचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जयप्रकाश द्विवेदी, मनपाच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जिचकार, रेनवातीओचे संस्थापक नकुल अग्रवाल व श्रद्धा अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त वैष्णवी म्हणाल्या, गेल्यावर्षी महानगरपालिकेच्या २० शाळांमध्ये सामाजिक भावनात्मक शिक्षणाचा हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम मिळाल्यानंतर या वर्षांपासून महानगरपालिकेच्या ५० शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महानगरपालिकांच्या शाळांमध्ये मध्यम व निम्न मध्यम वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. या विद्यार्थ्यांचे सामाजिक व भावनात्मक शिक्षण होण्याची आवश्यकता आहे. सध्या हा उपक्रम केवळ शनिवारला राबविण्यात येत आहे. हा उपक्रम दररोज राबविण्यात यावा, याचे चांगले परिणाम विद्यार्थ्यांवर होईल, असे वैष्णवी बी. यांनी यावेळी म्हणाल्या.

गेल्या वर्षी या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या काही विद्यार्थी व शिक्षिकांनी आपले अनुभव कथन यावेळी केले. गेल्या वर्षी या उपक्रमात महानगरपालिकेच्या ३५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना येणारा राग, चिडचिडेपणावर नियंत्रण मिळाल्याचे अनुभव विद्यार्थ्यांनी कथन केले. यावेळी नागपूर महानगरपालिकेच्या सामाजिक भावनात्मक शिक्षण ड्रीमकॅचर उपक्रमाच्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी, वेकोलिचे सीएमडी जयप्रकाश द्विवेदी, शिक्षणाधिकारी साधना सयाम, विनय बगले यांच्या हस्ते झाले. या उपक्रमासाठी महानगरपालिकेच्या शिक्षिकांचे प्रशिक्षण सुद्धा रेनवातीओ या संस्थेतर्फे घेतले जात आहे.

यावेळी बोलताना वेकोलिचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जयप्रकाश द्विवेदी म्हणाले, चांगल्या उपक्रमांना मदत करण्याचा नेहमीच वेकोलिचा प्रयत्न राहिला आहे. महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षणच नव्हे तर चांगले वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल, एका चांगला बदलाचे संकेत देत आहे. अशा उपक्रमांना वेकोलिचे नेहमीच प्रोत्साहन देत राहील, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नकुल अग्रवाल यांनी केले व या उपक्रमागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे आभार श्रद्धा अग्रवाल यांनी मानले. यावेळी महानगरपालिकेच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *