- Breaking News, कोविड-19, नागपुर समाचार, मनपा

नागपुर : शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, आठवडी बाजार ७ मार्चपर्यंत बंद

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आदेश : धार्मिक, राजकीय सभांसह सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवरही प्रतिबंध

नागपूर : शहरात वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेउन सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी मनपा हद्दीतील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था यासह शहरातील सर्व आठवडी बाजार ७ मार्च २०२१ पर्यंत बंद ठेवणे तसेच शहर सीमेमध्ये कोणतिही धार्मिक, राजकीय सभा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यावरही ७ मार्चपर्यंत प्रतिबंध लावण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

राज्यातील विविध भागांसह नागपूर शहरामध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाद्वारे कठोर पावले उचलण्यात येत आहेत. शहरातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत महापौर दयाशंकर तिवारी यांनी आढावा घेत आयुक्तांशी चर्चा केली होती. त्यावेळी आवश्यकता भासल्यास कठोर पावले उचलण्याचे निर्देशित केले होते. त्यानुसार आयुक्तांनी सदर आदेश जारी केले आहेत.

शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था बंद असल्या तरी त्यांना ऑनलाईन स्वरूपात शिक्षण व प्रशिक्षण सुरू ठेवता येणार आहे. शहर सीमेमध्ये धार्मिक, राजकीय सभांसह सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्यात आल्याने सदर कार्यक्रमांना व सभांना मनपा प्रशासनाने पूर्वपरवानगी दिली असल्यास ती रद्द समजण्यात यावी, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

मंगल कार्यालय, लॉनमधील आयोजनासही प्रतिबंध

नागपूर शहरातील सभागृह, मंगल कार्यालय, लॉन आदी ठिकाणी होणारे लग्न व इतर समारंभाच्या आयोजनासही प्रतिबंध घालण्यात आले आहेत. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील सभागृह, मंगल कार्यालय, लॉनमघ्ये २५ फेब्रुवारी २०२१ ते ७ मार्च २०२१ पर्यंत कुठलेही लग्न व इतर समारंभ आयोजित करता येणार नाही. सदर आयोजनाबाबत यापूर्वी मनपा प्रशासनाद्वारे पूर्वपरवानगी देण्यात आली असल्यास ती या आदेशाद्वारे रद्द झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शनिवारी व रविवारी बाजारपेठा, दुकाने बंद

नागपूर शहर सीमेतील वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र, दुध, भाजीपाला, फळे, पेट्रोल पम्प व इतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाजारपेठा व दुकाने दर शनिवारी व रविवारी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.

याशिवाय शहरातील हॉटेल, रेस्टॉरेंट, खाद्यगृह, दुकाने व इतर संस्थाने रात्री ९ वाजतापर्यंतच सुरू ठेवता येतील. हॉटेल, रेस्टॉरेंट, खाद्यगृह आदींमध्ये एकूण क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीसाठीच परवानगी देण्यात आली आहे.

मनपा आयुक्तांद्वारे जारी करण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती, संस्था, आस्थापनांवर साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, भा.द.वि.१८६० अन्वये गुन्हा दाखल केला जाईल.

मनपाच्या उपद्रव शोध पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी, संबंधित झोनचे सहायक आयुक्त व त्यापेक्षा वरीष्ठ दर्जाचे मनपाचे संबंधित अधिकारी, संबंधित पोलिस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरीष्ठ पोलिस अधिकारी सदर आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासंदर्भात कार्यवाही करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *