- Breaking News, कोविड-19, नागपुर समाचार, मनपा

नागपुर : चाचणी केंद्रांवर हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

महापौर दयाशंकर तिवारी यांचे निर्देश : शांतिनगर केंद्रावर आर.टी.पी.सी.आर. चाचणी होत नसल्याचे आले निदर्शनास 

नागपूर : मनपाच्या शांतीनगर आरोग्य केंद्रात आर.टी.पी.सी.आर. चाचणी होत नसल्याचे लक्षात येताच आज (ता. २१) महापौर दयाशंकर तिवारी यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा, असे निर्देश दिले. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले.

महापौर यांचे परिचित असलेले उमेश ओझा हे आज सकाळी गांधीबाग उद्यानाजवळ महापौर दयाशंकर तिवारी यांना दिसले. त्यांना ताप असल्याचे लक्षात येताच महापौरांनी त्यांची विचारपूस केली. शांतीनगरकडे राहात असताना अशा अवस्थेत इतक्या दूर कसे आले, असे विचारले असता त्यांनी कोरोना चाचणी करण्यासाठी भालदारपुरा केंद्रावर आल्याचे सांगितले. शांतीनगर येथून कालही परत पाठविण्यात आले. आजही तेथे आर.टी.पी.सी.आर. टेस्ट होत नसल्यामुळे भालदारपुरात यावे लागले असे सांगितले. 

हे ऐकून महापौर दयाशंकर तिवारी स्वत: शांतीनगर केंद्रावर पोहोचले. तेथे केवळ ॲन्टीजेन चाचणी सुरू होती. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता कातोरे अनुपस्थित होत्या. तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी मास्क घातलेले नव्हते. काही कर्मचाऱ्यांची मुलेही विना मास्कने तेथे उपस्थित होती.

महापौरांनी तातडीने वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चिलकर यांना दूरध्वनी करून वस्तुस्थितीवर नाराजी व्यक्त केली. तेथे आणि जेथे सुरू नसेल अशा केंद्रावर तातडीने आर.टी.पी.सी.आर. चाचणी सुरू करण्याचे निर्देश दिले. सर्व चाचणी केंद्रावर वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष ठेवून नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध तातडीने दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी माजी नगरसेवक रवी डोळससुद्धा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *