- Breaking News, खेलकुद , नागपुर समाचार

नागपूर समाचार : खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा रविवारी

आंतरराष्ट्रीय ॲथलिट हिमा दास यांच्या हस्ते होणार ध्वज वितरण

नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा रविवारी १७ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत कस्तुरचंद पार्क जवळील किंगस्वे हॉस्पिटल इमारतीतील भाई बर्धन स्मृती सभागृहामध्ये रविवारी (ता.१७) सकाळी ११.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय ॲथलिट हिमा दास यांच्या शुभहस्ते शहरातील विविध क्रीडा संघटनांना खासदार क्रीडा महोत्सवाचे ध्वज वितरीत करण्यात येतील.

 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे नागपूर शहर अध्यक्ष श्री. जितेंद्र (बंटी) कुकडे, आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. विकास कुंभारे, आमदार श्री. मोहन मते, आमदार श्री. प्रवीण दटके, भाजपा नागपूर जिल्हाध्यक्ष श्री. सुधाकर कोहळे, आमदार श्री. समीर मेघे, आमदार श्री. टेकचंद सावरकर उपस्थित राहतील. 

खासदार क्रीडा महोत्सवाच्या सहाव्या पर्वाला लवकरच सुरूवात होणार आहे. यंदाचा खासदार क्रीडा महोत्सव मागील पाच महोत्सवांच्या तुलनेत अधिक भव्य आणि आकर्षक ठरणार आहे. सहावे खासदार क्रीडा महोत्सव १७ दिवस चालणार असून या १७ दिवसांमध्ये शहरातील ६६ क्रीडांगणांवर ५५ खेळ खेळले जातील. यात विविध ५५ खेळांच्या १०५० चमू, ४८०० ऑफिसियल्स, ६५ हजार खेळाडूंचा समावेश असेल. एकूण १२५०० स्पर्धा खेळविण्यात येणार असून यात खेळाडूंना ८९८० मेडल्स आणि ७३५ ट्रॉफी देण्यात येतील. स्पर्धेतील विजेत्यांना १ कोटी ३५ लक्ष रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहेत. 

देशातील स्थानिक स्तरावरील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाची नागपूर शहरातील खेळाडू, क्रीडा संघटक, प्रशिक्षक या सर्वांसह प्रेक्षकांना देखील प्रतीक्षा आहे. ही प्रतीक्षा लवकरच पूर्ण होणार असून केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत आणि आंतरराष्ट्रीय ॲथलिट हिमा दास यांच्या शुभ हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा आणि क्रीडा संघटनांना ध्वज वितरण होत आहे. या समारंभाला शहरातील खेळाडू, क्रीडा संघटक आणि क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी महापौर, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक श्री. संदीप जोशी यांनी केले आहे.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनासाठी खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, कोषाध्यक्ष आशिष मुकीम, सदस्य नागेश सहारे, पद्माकर चारमोडे, डॉ. संभाजी भोसले, डॉ. विवेक अवसरे, सचिन देशमुख, अशफाक शेख, अमित संपत, सतिश वडे, सचिन माथने, सुनील मानेकर, लक्ष्मीकांत किरपाने, डॉ. सौरभ मोहोड, रमेश भंडारी, प्रकाश चांद्रायण आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *