- Breaking News, PRESS CONFERENCE, क्राईम खबर , नागपुर समाचार

नागपुर समाचार : काही भ्रष्ट माणसे पोलिस विभागातही – डॉ. रविंद्र सिंघल यांची स्पष्टोक्ती

🔸प्रेस क्लब येथे पाेलिस आयुक्तांनी साधला पत्रकारांसोबत मुक्त संवाद

🔸कोणताही तनाव न घेता पोलिसिंगचे काम पोलिसांनी एन्जॉय करावे: पोलिस आयुक्तांचा सल्ला

🔸नागपूरात रुजू होताच सर्वात आधी जिमची स्थिती बघितली:फिटनेस सजग आयुक्तांची माहिती

🔸स्मार्ट सिटी फक्त बाेलण्यासाठी नव्हे तर प्रत्यक्षात उतरवणार: पोलिस आयुक्तांचा निर्धार

🔸अम्ली पदार्थांची समस्या गंभीरच: सायबर गुन्ह्यांचा निपटारा शीघ्र गतीने करणार

🔸माध्यमांनी गुन्हेगारीचे वृत्त प्रसिद्ध करताना संयम बाळगणे गरजेचे

🔸टॅरेसवरील मद्यप्राशनांच्या घटनांवरही बसणार पायबंद:आयुक्तांचे आश्‍वासन

🔸रामझुला अपघात प्रकरणातील आरोपी रितीका मालूचा जामीन होणार रद्द :पोलिस आयुक्तांचे राहणार जातीने लक्ष

नागपूर समाचार : कुठलाही विभाग असले तरी काही हरामखोर ,गुन्हेगार लोग हे असतात,पोलिस विभागात देखील आहेत.ते समोर येतात त्यावेळी निश्‍चितच त्यांच्यावर कारवाई होते. मी एडनिशल सी.पी असताना एका प्रकरणात तर एक पोलिसकर्मी स्वत:घरफोडीमध्ये आरोपी निघाला.दोन अजून अश्‍या घटना आहेत ज्यात आमचेच पोलिस कर्मचारी सहभागी होते,ते ज्यावेळी सापडतात त्यावेळी त्यांच्यावर आम्ही कारवाई केली आहे.या शिवाय लाचलुचपत विभाग देखील त्यांच्यावर देखरेख ठेवतात व चुकीच्या कृत्यामध्ये जे कोणी सापडतात त्यांच्यावर आपण कारवाई करतो.माझी विभागाला स्पष्ट सूचना आहे की पोलिस विभागातील जो कोणी गुन्हेगारी कृत्यात सापडले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा,असे स्पष्ट उत्तर नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल यांनी दिले.त्यांनी आज दुपारी प्रेस क्लब येथे पत्रकारांसोबत मुक्त संवाद साधला.

तहसील पोलिस ठाण्यात पोलिसकर्मी असणा-या सचिन दिलीप मेश्राम तसेच एका अन्य पोलिसकर्मीच्या विराधोत तक्रारकर्ते हेमराज नंदनवार यांनी साढे चार लाख रुपये लृटण्याची तसेच तस्करीचा साठा देखील लंपास केल्याची तक्रार नोंदवली,या पार्श्वभूमीवरील प्रश्‍नावर वरील उत्तर पोलिस आयुक्त यांनी दिले.

मुंबईत आमदार गायकवाड गोळीबाराची घटना ऐन पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच घडली,अशा वेळी पोलिस विभागावर कोणता ताण येतो,राजकीय गुन्हेगारी पोलिस कशी हाताळतात?या प्रश्‍नावर बोलताना डॉ.सिंघल म्हणाले की,काही वेळी काही लोक हे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही.साहेब नाही आहे,साहेबांना भेटूच दिल्या जात नाही किवा इतर कोणतेही कारण सांगून आमच्यापयर्यंत पोहोचण्या पूर्वी अनेक अडथळे निर्माण केले जात असतात,त्यामुळे त्यातील काही लोक हे माध्यमकर्मींकडे जातात की बघा अमूक कुणा विरुद्ध कसा अन्याय होत आहे,दूसरे कोणत्या तरी लोकप्रिय सामाजिक व्यक्तीकडे धाव घेतात किवा काही जण राजकीय लोकांकडे पोहोचतात.ते माझ्यापर्यंत पोहोचले पाहीजे,माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे अडथळे आहेत ते मी कमी करणार,आम्ही जर कारवाई केली नाही तर कोर्टात आमची स्क्रूटिनी होते,पब्लिक मध्ये पण आमची स्क्रूटिनी होत असते,असे उत्तर त्यांनी दिले.पण नियमानुसार कारवाई आम्ही करीत असतो,असे उत्तर त्यांनी दिले.

सुरवातीला बोलताना,त्यांनी २०१३ मध्ये ते दक्ष्ण मध्य सांस्कृतिक केंद्रामध्ये संचालक पदी असताना त्यांनी ‘माटी के रंग‘नावाचा उपक्रम राबविला होता ज्याचे फार कौतूक झाले होते,अशी आठवण त्यांनी सांगितली.नागपूर शहर हे फार सुंदर शहर असून गेल्या काही वर्षांपासून विकसित शहर म्हणून आकार घेत असल्याचे सांगत मला कोणतेही काम मनापासून करण्याची आवड आहे,असे त्यांनी सांगितले.

शिद्दत के साथ काम करना चाहता हूं,असे सांगत माध्यमकर्मी यांना जे जसं समजतं तसं ते लिहतात,मी कोणतीही गोष्ट नकारात्मकतेनी घेत नाही.का लिहले?असा विचार येत नाही.तुमचं काम तुम्ही केलं,माझं काम मलाच करायचं आहे.तुम्ही जी टिका करता त्यात सुधारणा मलाच करायची आहे.नागपूरात देखील मी ह्दयापासूनच काम करणार आहे.या पूर्वी मी जिथे गेलो तिथे ही मी सर्वांशी भेटलो.माझे कार्यालय सर्वांसाठी खुले आहे.फार लांबून लोकं पदरातले पैसे खर्च करुन मला भेटायला,त्यांच्या समस्या सांगायला येतात त्यामुळे शेवटच्या माणासाला भेटल्याशिवाय मी माझा कक्ष सोडत नाही,नागपूरात देखील मी हेच करीत आहे,असे त्यांनी सांगितले.

कोणत्याही शहराच्या आरोग्यावर वाहतूक, कायदा आणि क्राईम या तीन गोष्टी परिणाम करतात.आपले शहर फक्त बोलण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’ नसून प्रत्यक्षात जे निर्णय घेतले जातात,त्याची जी अंमलबजावणी होत असते,त्यातून शहर स्मार्ट होत असतं.हीच सूचना मी माझ्या विभागाला दिली असून यासाठी ट्रेनिंग देणे सुरु असल्याचे ते म्हणाले.

शहरात गुन्हेगारी असो किवा हत्या,या सगळ्या घटनांच्या पाठीमागे मानसिक कारणे आहेत.तीन मित्र सोबत बसले होते,मद्य प्यायले,बोलताना एकाचा राग आला,रागाच्या भरात दोघा मित्रांनी मिळून तिस-याची हत्या केली.अशा घटनांवर बोलण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची गरज भासते.त्यांच्या मदतीची गरज असते.

आमच्यापर्यंत गुन्हेगारीच्या संदर्भात जी कोणतीही माहिती येते त्यावर विश्‍वास ठेवला जातो.त्यावर कारवाई केली जाते कारण आम्हाला माहिती पुरविणा-याचा विश्‍वास महत्वाचा वाटतो.माझ्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी कारवाई केली,हा विश्‍वास महत्वाचा असतो,असे ते म्हणाले.शहरात महिला,ज्येष्ठ नागरिकांविरुद्ध गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात घडत आहे.पेंशनधारक ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्यापासून तर अवैध सावकारी धंदे,खंडणी,जमीनीवर कब्जा इत्यादी स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद होत आहे.ज्येष्ठांच्या घरावर मुलांनी कब्जा करुन त्यांना बेघर करण्याच्या घटनेत पोलिसांना सख्त निर्देश दिले असून अशा घटनांवर कारवाई करताना ज्येष्ठ व पिडीत नागरिक हे स्वत:चे कुटूंबिय आहेत असे समजून करा,असे पोलिस आयुक्त म्हणाले.

याशिवाय सायबर क्राईम हा देखील खूप वाढला आहे.सगळ्या समाज माध्यमांवर अश्‍या स्वरुपाची गुन्हेगारी घडत असून या यंत्रणेला अजून सक्षम करण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली.सायबर क्राईमच्या प्रत्येक तक्रारीवर तातडीने कारवाईची गरज असते.गुन्हेगार कितीही हूशार असला तरी गुन्हा करताना काही ना काही फूट प्रिंट सोडतच असतो.आमची कारवाई त्या दिशेने चालू राहणार,यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करुन ट्रेनिंग देणे चालू राहणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.आर्थिक गुन्हेगारी,व्हाईट कॉलर क्राईम या विरोधात जनसामान्यात जागरुकता कशी येईल यावर काम करणार असल्याचे ते म्हणाले.नाशिक मध्ये असताना सायबर क्राईम या विषयी विविध शाळांमध्ये जाऊन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर करण्यात येत असे,याशिवाय बाजारपेठा,विविध वसत्या,सोसायटी,कमर्शियल कॉम्पलेक्स इत्यादी ठिकाणी देखील सायबर क्राईमबाबत जनजागृतीपर उपक्रम राबविले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

शहरातील आणखी एक भीषण गुन्हेगारी ही अम्ली पदार्थशी(ड्रग्ज)संबंधित आहे.आम्ही नार्को टेस्टच्या यूनिटला अधिक सक्षम करु.शहरातील सर्व पब्सला आम्ही पत्र पाठवले आहे.कोणतीही गुन्हेगारीची घटना घडली तर त्याची जवाबदारी पबवर निश्‍चित केली जाईल.केवळ पबच्या आत काही गटांमध्ये किवा व्यक्तींमध्ये राडा झाला व बाऊंसरच्या मदतीने त्यांना पबच्या बाहेर काढून जवाबदारीतून सूटता येणार नाही.जी कोणती घटना घडेत ती पोलिसांना सांगावीच लागेल,सीसीटीव्ही फूटेज सांभाळून ठेवावी लागेल,अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

याशिवाय लवकरच लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत,त्यासंबधी निवडणूक आयोगाच्या सूचना फार स्पष्ट आणि कठोर आहेत. कोणतीही निवडणूक म्हटली तर त्याचे अनेक टप्पे असतात.पहील्या टप्प्यापासूनच सुरक्षेची जवाबदारी पोलिसांवर असते.त्याही संदर्भात आम्ही आमचे कर्तव्य पार पाडू.निवडणूक संदर्भात काही तक्रारी असल्यास पोलिसांना कळवा.माहिती ही सत्य किवा असत्य असेल तरी कारवाई केली जाईल.

याशिवाय लहान मुलांची सुरक्षाही महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.महिलांना नागपूर हे शहर सुरक्षीत वाटलं पाहिजे.त्या सुरक्षीत शहरामध्ये फिरतात आहे,अशी भावना निर्माण करु,असे आश्‍वासन याप्रसंगी पोलिस आयुक्तांनी दिले.

मी ३१ जानेवरी रोजी नागपूर शहरात पोलिस आयुक्त पदी रुजू झालो.गेल्या एका महिन्यात मी क्राईम पॅटर्न अनॅलिसीस केले.याशिवाय पत्रकारांकरवी भरपूर माहिती मिळाली,त्याचा ही अभ्यास करतोय.कारवाई तर होणारच असे सांगून ‘We will change the Perception,We will change a scenario‘नागपूरातून जेव्हा कधी माझी बदली इतर ठिकाणी होईल त्यावेळी मी माझ्या कर्तव्यकाळात नागपूरात काय बदलाव आणू शकलो हे मांडील आणि ते माझ्यासाठी फार मोठे बक्षीस असेल,असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

सायबर क्रिमिनलने तर तुमचेच फेक अकाऊंट बनवले,याकडे लक्ष वेधले असता,गुन्हेगार हे क्रिएटर्स आहेत,फेक अकाऊंट बनवणे त्यांना सहज शक्य आहे.याचे तार राजस्थानपर्यंत जुळले आहेत,गुन्हा दाखल झाला आहे,तपास सुरु आहे,लवकरच ते पकडले जातील.आम्ही फेक अकाऊंट बंद करण्यासाठी संबंधित कंपनीला पत्र दिले आहे.तरीही जनजागृती महत्वाची असून कधीही,कोणत्याही भूलथापांना बळी पडून आपला ओटीपी देऊ नका,असे आवाहन त्यांनी केले.

कलम ३५४ व ३७६ संदर्भात पोलिसांनी संवेदनशील होऊन कारवाई करावी,असे तुमचे स्पष्ट निर्देश असताना कळमना व बेलतरोडी पोलिस ठाण्यात,या कलमा संदर्भातील दोन घटनांबाबत कोणतीही संवेदनशीलता दिसून पडली नाही,पत्रकाराने दोन घटनामधील पिडीतांचा संदर्भ देऊन प्रश्‍न केला असता.संबंधित पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकावर कारवाई केली जाईल,असे आश्‍वासन पोलिस आयुक्तांनी दिले.माझ्या सर्व पोलिस ठाण्याला स्पष्ट सूचना आहे,या संदभात पहीले केस दाखल करा,या दोन्ही केसेस संदर्भात प्रेस क्लबमधूनच मी संबंधित पोलिस निरीक्षकांना सूचना देतो,असे आयुक्तांनी पत्रकाराला आश्‍वासित केले.

यावेळी पोलिस आयुक्तांच्या फिटनेसविषयी एक पत्रकाराने छेडले असता,मी नागपूरला रुजू झाल्यावर पहीले काम हेच केले येथील जिमची सुविधा बघितली,असे मिश्‍किल उत्तर त्यांनी दिले.जिम अधिक कसे प्रगत होऊ शकेल यासाठी माझे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.परवा आमच्या एका पोलिस अधिका-याल हार्टअटैक आला.त्याने चार दिवसांपूर्वीच तपासणी केली होती मात्र वैद्यकीय अहवाल त्याना वेळेवर न मिळाल्यामुळे याची कल्पना येऊ शकली नाही.यावर काम करने महत्वाचे असल्याचे सांगून,पोलिसांनी पोलिसिंग म्हणज त्यांचे काम कोणताही ताण न घेता Enjoy केले पाहिजे,असा सल्ला त्यांनी दिला.पोलिसांना दिवसातून ८ ते १६ तास कधीकधी उभे राहवे लागते,अशावेळी शरीर व मनाला सस्टेंड करण्याची क्षमता त्यांच्यात असायला हवी.

ऑन-लाईन हत्यारे बोलविण्याकडे गुन्हेगारांचा कल व सहज उपलब्ध होणारी शस्त्रात्रे,याकडे लक्ष वेधले असता,जॉईंट सी.पीं सोबत याबाबत चर्चा झाली असून काही वेबसाईट्स या ‘डार्क वेब’आहेत,त्यामुळे माहिती मिळवणे अवघड असून यावर देखील आम्ही काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी एका पत्रकाराने शहरातील गुन्हेगारीच्या संदर्भात सर्वाधिक माहिती ही सतत फिरत असणा-या डीपी स्कॉडला असल्याचे सांगितले त्यामुळे प्रत्येक पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक व डी पी स्कॉडमध्ये समन्वय घडवून आणल्यास गुन्हेगारीचे प्रमाण कमी होणार नाही का?असा प्रश्‍न केला असता,अजनीमध्ये घडलेले हत्याकांडाच्या घटनेत आरोपी हा तडीपार गुंड होता,डी.पी.स्कॉडला हे माहिती असायला हवे होते,त्यांनी कर्तव्यात कसूर केली त्यामुळे त्यांची बदली पोलिस मुख्यालयात केल्याची माहिती याप्रसंगी पोलिस आयुक्तांनी दिली.

याप्रसंगी टॅरेसवर चालणारे अवैध मद्यप्राशन याकडे लक्ष वेधले असता ती बंद झाली पाहिजे. आम्हाला लक्षात आणून दिले तर ती आम्ही नक्कीच बंद पाडू,असे उत्तर त्यांनी दिले.

शहरातील सततचा ट्रॅफिक जाम व भीषण पार्किंगची समस्या याकडे लक्ष वेधले असता शहर कसे आहे हे त्या शहरातील वाहतूक व्यवस्थेतून निर्देशित होत असते, असे ते म्हणाले. वाहतूक विभागाने या संदर्भात कोणते नोटीफिकेशन काढले ते बघू, नाशिकमध्ये पार्किंगच्या जागेसंबधी माहिती देण्याकरीता मेंसर्स लावले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

शहरातील अनेक ऑटो चालकांची मुजोरी व शिरजोरी यावर प्रश्‍न केला असता, अनेक ऑटो चालक हे भाड्याने ऑटो चालवतात, दिवसभर जे काही हातावर पैसे पडतात त्यातून ऑटोचे भाडे व कुटूंबाचा प्रपंच यावर त्याला खर्च करने भाग आहे.त्यांच्यावरील जवाबदारी आम्ही देखील समजून घेतो मात्र कोणत्याच प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला.

शहरात विदेशी घूसखोरांची संख्या लक्षणीय असल्याचे सांगत एका पत्रकाराने १५ दिवसांपूर्वी एका बांग्लादेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली मात्र १५ दिवसात त्यांना त्याचा लॅपटॉपही जप्त करता आला नाही. मोठ्या शिफातीने एटीएस कारवाई करते व आरोपीला पोलिसांच्या हवाली करते, अशावेळी पोलिसांची देशाच्या सुरक्षेसंबंधित गांर्भीय समजून न घेता कारवाईसाठी टाळाटाळ योग्य आहे का? असा प्रश्‍न केला असता,माहिती घेतो, निश्‍चितच कारवाई केली जाईल अशी हमी त्यांनी दिली.

पत्रकारांनी देखील नागपूर शहरावरील क्राईम कॅपिटलचा डाग पुसण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करीत, गुन्हासंबंधींचे मथळे, नागपूर शहर हत्याकांडाने हादरले, पोलिस आयुक्तांना दुहेरी मर्डरने मिळाली सलामी,इत्यादी असे दिल्याने पत्रकारांना, वाचकांना नेमके काय सांगायचे आहे? असा प्रश्‍न पोलिस आयुक्तांनीच पत्रकारांना केला व हत्याकांड किवा गुन्हेगारीसंबंधीचे वार्तांकन करताना संवेदनशीलची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

रामझुल्यावर घडलेला अपघात,त्यात दोन निष्पाप तरुण मुलांचा गेलेला जीव याविषयी जनतेमध्ये पराकोटीचा रोष असून, मद्य प्राशन करुन चारचाकी वेगाने चालवणारी आरोपी रितिका मालू व अन्य आरोपी महिलेच्या विरोधातील जामीन रद्द करुन हत्येचे कलम लावण्यात आले आहे का? पोलिसांनी अपघात घडला त्याच वेळी आरोपींना ‘रसूख ‘बघून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे.आरोपी मालू या शहरातील फार मोठ्या व श्रीमंत भंगार व्यवसायीकाची पत्नी आहे त्यामुळे पैशांच्या जोरावर केलेल्या अपराधातून सूटण्याचा प्रयत्न होत आहे का?असा प्रश्‍न केला असता,नुसता हाच अपघात नाही तर २४४ पेक्षा अधिक ‘हिट ॲण्ड रन’च्या केसेस आहेत. प्रत्येक केस ही माझ्यासाठी संवेदनशील आहे कारण त्यात कोण्या ना कूणाचे कुटूंबिय बाधित झाले आहेत. परिणामी, रामझुल्यावरील अपघात प्रकरणात पुढे काय कारवाई झाली याची माहिती तहसील पोलिस ठाण्यातून मागवतो,असे आश्‍वासन याप्रसंगी पोलिस आयुक्तांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *