- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार: ‘गबन’ कादंबरीचा अनुवादही कालजयी – डॉ. रजनीशकुमार शुक्‍ल

आशा पांडे यांच्या मराठी ‘गबन’ चे थाटात प्रकाशन 

नागपूर समाचार : हिंदी साहित्य विश्वातील थोर कादंबरीकार मुंशी प्रेमचंद यांनी ‘गबन’ ही कादंबरी उर्दू मिश्रित हिंदीत लिहिलेली असून अनुवाद करायला अतिशय कठीण आहे. बदलत्‍या काळ, सामाजिक पार्श्‍वभूमीमध्‍येही ही कादंबरी प्रासंगिक ठरणारी असून बहुभाषिक साहित्यिक लेखिका आशा पांडे यांनी मराठी केलेला कादंबरीचा अनुवादही तितकाच कालजयी आहे, असे प्रतिपादन वर्ध्‍याच्‍या महात्मा गांधी हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीशकुमार शुक्ल यांनी केले.

मुंशी प्रेमचंद यांच्‍या ‘गबन’ या लोकप्रिय हिंदी कादंबरीचा ज्येष्ठ बहुभाषिक साहित्यिक व साहित्य विहार संस्थेच्‍या अध्यक्ष आशा पांडे यांनी मराठीत अनुवाद केला असून त्‍याचे प्रकाशन मंगळवारी नवदृष्टी सभागृहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रेष्ठ समीक्षक, लेखक डॉ. वि. स.जोग होते तर डॉ. रजनीशकुमार शुक्‍ल प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्थित होते. लोकव्रत प्रकाशन, पुणेचे सचिव शिरीष कुलकर्णी आणि राज्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र शासन राहुल पांडे यांची देखील यावेळी विशेष उपस्थिती होती. 

मुंशी प्रेमचंद यांनी ‘गबन’ मध्‍ये व्‍यक्‍ती आणि समेष्‍टीचे राजकीय, सामाजिक, भावनिक, मनोवैज्ञानिक विश्‍लेषण केले आहे. आशा पांडे या पाच भाषांमध्‍ये सृजनात्‍मक कार्य करीत असल्‍यामुळेच अशा कठीण कादंबरीचे अनुवादाचे कार्य पूर्णत्‍वासे नेणे त्‍यांना शक्‍य झाले, अशा शब्‍दात डॉ. शुक्‍ल यांनी कौतुक केले. 

डॉ. वि. स. जोग यांनी प्रेमचंद यांचा सर्वश्रेष्ठ कादंबरीकार असा उल्‍लेख करताना त्‍यांच्‍या कादंबरीचा मराठीत आशा पांडे यांनी केलेला अनुवाद मराठी वाचकांची अंत:शुद्धी करणारा आहे, अशा शब्‍दात आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. सामाजिक बांधिलकी हा मुंशी प्रेमचंद आणि आशा पांडे यांच्‍यातील समान धागा असल्‍यामुळेच ‘गबन’ कादंबरी त्‍यांनी मराठीत आणली, असे ते म्‍हणाले. 

‘गबन’ या मराठी कादंबरीतून अनुवादाची वेगळी, प्रवाही पद्धत वाचकांच्‍या लक्षात येईल. हा अनुवाद उत्‍कृष्‍ट झाला आहे, असे शिरीष कुळकर्णी यांनी व्‍यक्‍त केले. आशा पांडे यांनी समाजहित व राष्‍ट्रहित या दोन अंत:प्रेरणा त्‍यामागे होत्‍या असे मत अनुवादामागची भूमिका विशद करताना व्‍यक्‍त केले. राहूल पांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक करताना आशा पांडे यांच्‍या लेखनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रगती वाघमारे यांनी केले तर आभार राहूल पांडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *