
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा नागपूर येथे ‘मातृत्वयोग’ उपक्रमाला प्रारंभ
नागपूर समाचार : गर्भवती महिलांनी आपले बाळ शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्टीने सुदृढ जन्माला यावे, यासाठी या काळात योग, प्राणायाम केले, प्रसन्न राहिले आणि गर्भसंस्काराचे धडे घेतले तर घरोघरी शिवाजी जन्माला येतील, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता व संस्कार भारतीयच्या अध्यक्ष सौ. कांचन गडकरी यांनी केले.
विवेकानंद केंद्राच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून व मातृत्वयोग उपक्रमाला पंचवीस वर्ष झाल्यानिमित्ताने विविध पंचवीस केंद्रामध्ये ‘मातृत्वयोग’ उपक्रम राबविला जात आहे. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा नागपूर केंद्राचे उद्घाटन कांचनताई गडकरी यांच्या उपस्थितीत शनिवारी पार पडले. टेमरिंड हॉल, चिटणवीस सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमात ‘मातृत्वयोग’ या उपक्रमाच्या संयोजिका सोलापूर येथील स्त्रीरोग व प्रसुतीतज्ज्ञ डॉ. शोभा शहा मुख्य वक्ता म्हणून उपस्थित होत्या तर मंचावर नागपूर नगर प्रमुख क्षमा दाभोळकर, उपक्रमाच्या शहर प्रमुख जयश्री भिडे यांची उपस्थिती होती.
कांचनताई गडकरी यांनी मातृत्वयोग उपक्रमाचे कौतुक केले. पस्तीस वर्षांपूर्वी नागपुरात विवेकानंद केंद्राच्या स्थापनेपासूनचा प्रवास उलगडताना केंद्रातर्फे गर्भवती महिलांसाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितपणे यशस्वी होईल, अशी आशा व्यक्त केली.
डॉ. शोभा शहा यांनी ‘मातृत्वयोग’ ही संकल्पना पहिल्यांदा विवेकानंद केंद्रानेच सुरू केल्याचे सांगत गर्भवती असताना महिलांना योगासने, प्राणायम केल्यास त्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहते, मनातली भीती कमी होते, मन प्रसन्न व उत्साही राहते आणि त्याचा सकारात्मक परिणाम बाळाच्या वाढीवर होतो, असे सोदाहरण सांगितले. जन्माला येणारे प्रत्येक बाळ ही या राष्ट्राची संपत्ती असून ते सुदृढच जन्माला यावे,याचा प्रत्येक मातेने प्रयत्न करावा. कितीही सांस्कृतिक आक्रमणे झाली तरी कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवावी व अमृतासह परिवार घडवावा, असे आवाहन केले.
येत्या, 4 फेब्रवारीपासून विवेकानंद्र केंद्र, 26, अत्रे लेआऊट येथे दर शनिवारी दुपारी 4 ते 6 वाजेदरम्यान ‘मातृत्वयोग’ चे नि:शुल्क वर्ग घेतले जाणार आहेत. विवेकानंद मिशन, खापरी येथेदेखील हे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. गर्भवती महिलांना या वर्गांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जयश्री भिडे यांनी प्रास्ताविकातून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुश्री शास्त्री यांनी केले तर क्षमा दाभोळकर यांनी आभार मानले. उमा वैद्य यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर कीर्ती पुराणिक यांनी गीत सादर केले.