- नागपुर समाचार

गुणवत्ता वाढवा, उद्योगही वाढेल: श्री नितिनजी गडकरी

NBP NEWS 24,

25 मार्च 2022.

युथ एम्पावरमेंट समिटचे थाटात उद्घाटन.

युथ एम्पावरमेंट समिटचे थाटात उद्घाटन
शेकडोंच्या संख्येत युवावर्गाची उपस्थिती

नागपूर,२५ मार्च २०२२ : बेरोजगारी ही आपल्या देशासमोरील सर्वात मोठी समस्या आहे आणि गरीबी-भूकबळी या त्यासोबत येणा-या समस्या आहेत. युवकांनी रोजगार मागणारे न होता, देणारे व्हावे असे आपण म्हणतो आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वत:चे कौशल्य आणि गुण शोधून त्यांचे व्यवसाय आणि उद्योगात रुपांतरीत करावे. पण, हे करत असताना, आपण देत असलेली सेवा आणि उत्पादने गुणवत्तापूर्ण असावीत आणि त्यांचे पैकेजिंग उत्तम असावे, असे आग्रही प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

फॉच्र्युन फाऊंडेशनच्या वतीने सलग आठव्या वर्षी आयोजित ‘युथ एम्पावरमेंट समिट’चे उद्घाटन करताना ते बोलत होते. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी विविध उदाहरणे आणि कल्पक उपक्रमांची माहिती दिली. तत्पूर्वी, दीपप्रज्वलन करून आणि स्टॉलची फित कापून त्यांनी समिटचे औपचारीक उद्घाटन केले. यावेळी, प्रमुख पाहुणे म्हणून, माजी खासदार अजय संचेती, ए.एस.अ‍ॅग्री अ‍ॅण्ड अ‍ॅक्वा एलएलपीचे अध्यक्ष डॉ.प्रशांत झाडे यांच्यासह महापौर दयाशंकर तिवारी, उद्योगपती अतुल गोयल, राजेश रोकडे, प्यारेखान यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी आणि समाजातील मान्यवरांची उद्घाटन समारोहाला प्रमुखउपस्थिती होती.

Prpf. Anil Sole
(President, Fortune Foundation)

उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक फॉच्र्यून फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी केले. ते म्हणाले की, कोरोना नंतरही भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विकसित होते आहे. नवउद्योगांना चालना देण्यासाठी कार्यरत असल्याचा पुनरुच्चार करून ते म्हणाले की, फॉच्र्यून फाऊंडेशन युवावर्गाला नवी संधी, माहिती आणि व्यासपीठ देण्यासाठी कार्यरत आहे. रोजगारक्षम युवक आणि सक्षम कंपन्यांची सांगड घालून देण्याचे महत्कार्य फॉच्र्यून फाऊंडेशन गेल्या सात वर्षांपासून सातत्याने करीत आहे. युथ एम्पावरमेंट समिटचे यंदा आठवे वर्ष आहे, असेही त्यांनी नमूद केले.

असंख्य युवा वर्ग Youth Empowerment Summit मध्ये उपस्थित होता.

भारतीय स्टेट बँकेच्या वतीने मुद्रा आणि इतर योजनांच्या अंतर्गत कर्जाचे वाटप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावर्षीदेखील, फॉच्र्यून फाऊंडेशनच्या वतीने, शुक्रवारपासून युथ एम्पवारमेंट समिट २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग अर्थात एमएसएमई, इंजिनियरींग कॉलेज प्लेसमेंट असोसिएशन म्हणजे ईसीपीए आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने, उद्यमशील युवकांचा हा महामेळावा आयोजिण्यात आला आहे.

आमदार निवास, सिव्हील लाईन्स, नागपूर येथेआयोजित या समिटमध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध असून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मान्यवरांचे प्रेरक मार्गदर्शन, परिसंवाद, सरकारी महामंडळ आणि खासगी योजनांच्या स्टॉल्ससह अनेक मशिनरीजचा प्रदर्शनात समावेश राहणार आहे. शिवाय, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आणि मुद्रा लोन योजनेंतर्गत सर्व बँकांद्वारे मार्गदर्शन शिवाय, नोकरीसाठी प्रत्यक्ष मुलाखती असे संधींचे भांडार युवावर्गााठी खुले झाले आहे. दहावी आणि त्यापुढे शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींसाठी या समिटमध्ये रोजगाराच्या संधी असून, अद्याप नोंदणी न केलेल्यांनाही प्रवेश मिळणार आहे.

अशी करा नोंदणी-
युथ एम्पावरमेंट समिट तीन दिवस म्हणजे २५, २६ आणि २७ मार्च २०२२ रोजी आयोजित असून, शेकडो कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पाच हजार जागांसाठी ऑफलाईन मुलाखती होणार आहेत. युवक-युवतींनी नोंदणी करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून, येस नागपूर फॉच्र्यून फाऊंडेशनअ‍ॅप YESNAGPUR(Fortune Foundation)APP) डाऊनलोड करावे. तसेच, www.anilsole.in/www.yesnagpur.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. उमेदवार अधिक माहितीसाठी ८७९९९३०२५३ या क्रमांकावर संपर्क करू शकतात. उमेदवारांना वेळोवेळी अ‍ॅपच्या माध्यमातून सूचना देण्यात येतील. रोजगारइच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने या आयोजनाचा लाभ घ्यावा आणि नावनोंदणी करावी, असे आवाहन फॉच्र्यून फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *