- नागपुर समाचार

महावितरणच्या सासवड विभागाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे ऊर्जामंत्र्यांनी दिले निर्देश

*महावितरणच्या सासवड विभागाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे ऊर्जामंत्र्यांनी दिले निर्देश*

मुंबई –  हवेली तालुक्यातील 19 गावे सासवड विभागाला जोडण्यासह व भविष्यातील वाढती ग्राहक संख्या लक्षात घेऊन दोन नवीन उपविभाग निर्माण करून विभागाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज महावितरणला दिले.

महावितरण सासवड विभागालगतची हवेली तालुक्यातील 19 गावे यांचा समावेश करून नव्याने उपविभाग निर्माण करण्याची व सासवड विभागाची पुनर्रचना करण्याची पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केलेल्या मागणीला अनुसरून सह्याद्री आथितिगृह, मुंबई येथे आज एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार संजय जगताप यांच्या मतदार संघातील वडकी, उरळीदेवाची, फुरसुंगी, भेकराईनगर, शेवाळेवाडी, आंबेगाव खु, आंबेगाव बु, उंड्री, पिसोळी, होळकरवाडी,
येवलेवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, वडाचीवाडी, भिलेरवाडी, गुजर-निंबाळकरवाडी इत्यादी गावांचा समावेश करून नवीन उपविभाग करण्याची मागणी केली आहे.
तसेच भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी सासवड विभागाची पुनर्रचना करून यातील भोर उपविभाग वेगळा करून मुळशी विभागाला जोडण्याची मागणी केली आहे.

सध्या भोर उपविभाग बारामती परिमंडळात असल्याने ग्राहकांना अडचणी निर्माण झाल्या असून मुळशी विभागात याचा समावेश झाल्यास ग्राहकांना सोयीस्कर होणार आहे. मुळशी विभाग पुणे परिमंडळात असून याचा फायदा ग्राहकांना होणार असल्याचे संग्राम थोपटे यांनी सांगितले.

आमदार थोपटे व जगताप यांच्यासह यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक संचालन संजय ताकसांडे व ऊर्जामंत्री यांचे सल्लागार उत्तम झाल्टे उपस्थित होते तर पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *