धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि कोराडी येथील नवरात्रोत्सवाचा घेतला आढावा
नागपूर समाचार : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी आणि कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे तसेच कोराडी येथे नवरात्रोत्सवाची सर्व व्यवस्था संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून पूर्ण करण्याची गरज आहे. पिण्याचे पाणी, साफसफाई, प्रकाश व्यवस्था, बसेसची व्यवस्था, पोलीस व्यवस्था, अग्निशामक उपाययोजना, ,आकस्मिक पाऊस आल्यास निवास व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्था, बाहेर पडण्यासाठीचे मार्ग, वाहतूक, पार्किंग व्यवस्था तत्काळ पूर्णत्वास नेण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि कोराडी येथील नवरात्री उत्सवाच्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी आमदार नितीन राऊत, आमदार चरणसिंह ठाकूर, माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सह पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., डॅा. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस येथे येणाऱ्या अनुयायांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी, सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत राहावेत तसेच आकस्मिक रुग्णसेवेसाठी डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पूरक व्यवस्थेची तयारी झाल्यानंतर सर्व जबाबदार अधिकाऱ्यांनी परस्परांशी समन्वय ठेवून पाहणी करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची विपुल उपलब्धता, निवास व्यवस्था, पुरेशे टॅायलेट याची खातरजमा अधिकाऱ्यांनी करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले
नागपूर महानगरपालिकेतर्फे धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त दीक्षाभूमी येथे येणा-या अनुयायांसाठी पुरविण्यात येणा-या मुलभूत सुविधांच्या व्यवस्थापनाची माहिती देण्यात आली. यात दिशादर्शक नकाशा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साफसफाई, शौचालयाची व्यवस्था, दिवाबत्तीची व्यवस्था, परिवहन व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय आरोग्य व्यवस्था आदींची माहिती बैठकीत देण्यात आली. दीक्षाभूमी परिसरालगतच्या सर्व रस्ते व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी २४ तास तास घन कचरा व्यवस्थापन विभागाची यंत्रणा कार्यरत असणार आहे. आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिकेकडून आरोग्य व्यवस्थेकरीता २४ तास पाच ठिकाणी तात्पुरते आरोग्य केंद्र अॅम्बुलन्ससह कार्यरत असणार आहे. संबंधित वरिष्ठ पोलिस अधिका-यांकडून सादरीकरणाद्वारे दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस, कोराडी देवी नवरात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा व माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस येथे येणा-या अनुयायांच्या सोईसाठी प्रवेश आणि निर्गमनाचे स्वतंत्र मार्ग, होमगार्डसची नियुक्ती, मोबाईल टॅायलेट, पुरेशी बसेसच्या व्यवस्थेची सूचना यावेळी करण्यात आली. कोराडी येथील नवरात्रोत्सवाच्या तयारीचाही यावेळी आढावा घेण्यात येत आला. यात मदत केंद्र, विद्युत, अग्निशमन व्यवस्था, बस व्यवस्था, सीसीटीव्ही आदींची माहिती व आढावा यावेळी घेण्यात आला.