- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : हिंगणा एमआयडीसी महिंद्रा अँड महिंद्रा उद्योगात औद्योगिक रासायनिक आपत्तीवरील ऑफसाईट आपत्कालीन मॉक ड्रिल

नागपूर समाचार : गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या अधिपत्याखालील महासंचालक (NDRF) तसेच जिल्हाधिकारी, नागपूर यांच्या निर्देशानुसार, लेवल-3 ऑफसाईट आपत्कालीन मॉकड्रिल महिंद्रा अँड महिंद्रा लि., एमआयडीसी हिंगणा, नागपूर येथे यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. या सरावाचा मुख्य उद्देश म्हणजे औद्योगिक रासायनिक आपत्तीच्या प्रसंगी आपत्कालीन तयारी व समन्वयित प्रतिसाद यंत्रणा कितपत प्रभावी आहेत, याचे मूल्यांकन करणे होय.

मॉक ड्रिल परिदृश्य : या सरावामध्ये, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या गेट क्रमांक 3 जवळील 30 मेट्रिक टन क्षमतेच्या (दोन माऊंडेड बुलेट्स) प्रोपेन यार्ड मध्ये प्रोपेन गॅस गळती व त्यानंतर लागलेली आग असा प्रसंग निर्माण करण्यात आला. परिस्थिती वेगाने बिघडत गेली आणि कारखाना परिसरात 7 जण जखमी झाले. तसेच शेजारील व्यावसायिक व निवासी क्षेत्रात धोकादायक परिणाम दिसू लागले. या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाचा हस्तक्षेप व ऑफसाईट आपत्कालीन योजना सक्रिय करणे आवश्यक झाले.

सहभागी यंत्रणा : या मॉक ड्रिलमध्ये विविध आपत्कालीन व सहाय्यक यंत्रणांचा उत्साही सहभाग होता. त्यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, एनडीआरएफचे कृपाल मुळे व 26 सदस्यांची टीम, एसडीआरएफचे 10 सदस्य, स्थानिक पोलीस विभागाचे 7 सदस्य, नागपूर महानगरपालिका, अग्निशमन वाहनासह 5 सदस्यांची टीम, एमआयडीसी अग्निशमन दलाचे अग्निशमन वाहनासह 6 सदस्यांची टीम, आरोग्य विभागाचे सदस्य व 2 रुग्णवाहिका, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अधिकारी, महिंद्रा अँड महिंद्रा आपत्कालीन प्रतिसाद पथकाचे अग्निशमन वाहन व रुग्णवाहिका यांचा सहभाग होता.

मुख्य निरीक्षणे : हा सराव उत्साह, समन्वय आणि बांधिलकीने पार पडला. पथकांनी वेळेवर संपर्क, अग्निशमन, बचाव कार्य व वैद्यकीय मदत केली. जिल्हा व औद्योगिक आपत्कालीन यंत्रणा प्रभावीपणे सक्रिय झाल्या होत्या.

मार्गदर्शन व देखरेख : या सरावास डीआयएसएचचे अतिरिक्त संचालक (प्रभारी) जयंत मोहोरकर, उपसंचालक माधव रत्नपारखी, अभिजित पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे संयंत्र प्रमुख नितीन वैद्य या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व देखरेख लाभली. या लेवल-3 ऑफसाईट आपत्कालीन मॉक ड्रिलद्वारे ठरवलेली उद्दिष्टे यशस्वीरीत्या साध्य झाली असून, नागपूर विभागातील औद्योगिक रासायनिक आपत्ती व्यवस्थापनासाठीची आपत्कालीन तयारी अधिक मजबूत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *