गडचिरोली समाचार : महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूच्या उत्पादन, विक्री आणि वाहतुकीवर बंदी घातली असतानाही, गडचिरोली पोलिसांनी आरमोरी तालुक्यातील मौजा डार्ली येथे एका घरावर छापा टाकून एक मोठा अवैध सुगंधित तंबाखू कारखाना उघडकीस आणला आहे. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या निर्देशानुसार, अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेला सोपवण्यात आली होती. त्यानुसार, 2 सप्टेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मौजा डार्ली येथील रेखाबाई सडमाके यांच्या घरी अवैध कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घराची झडती घेतली. झडतीमध्ये, पोलिसांना मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू, तसेच त्याचे उत्पादन आणि पॅकेजिंग करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री सापडली. पोलिसांनी एकूण 3 लाख 31 हजार रुपयांचा तयार सुगंधित तंबाखूचा साठा आणि 4 लाख 53 हजार 200 रुपयांची यंत्रसामग्री, असा एकूण 7 लाख 84 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जप्त केलेल्या साहित्यामध्ये 288 किलो कच्चा तंबाखू, विविध ब्रँड्सचे तयार तंबाखूचे डब्बे, पॅकेजिंग मशीन्स, वजनकाटा आणि इतर उपकरणे यांचा समावेश आहे. या कारवाईनंतर, अन्न व औषध प्रशासन विभागाने आरमोरी पोलीस ठाण्यात ओमप्रकाश शंकर गेडाम आणि इतर चार फरार आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-2006 आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ओमप्रकाश गेडाम याला अटक केली असून, इतर चार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि. संतोष कडाळे, पोस्टे आरमोरी हे करत आहेत.