- कोविड-19, नागपुर समाचार

म्हाडा कॉलनीतील पॉझिटिव्ह कामगारांचा सार्वजनिक ठिकाणी वावर महापौरांनी केली कामगार वसाहतीची आकस्मिक पाहणी : म्हाडा व्यवस्थापनाला बजावली नोटीस

नागपूर समाचार : 27 मार्च, गीतमंदिर समोरील गुजरवाडी परिसरात निर्माणाधीन म्हाडा कॉलनीच्या कामगार वसाहतीतील कोरोनाबाधित कामगार खुलेआम फिरत असल्याच्या माहितीवरून महापौर दयाशंकर तिवारी यांनी पथकासह आकस्मिक भेट दिली. त्यातील कोरोनाबाधित कामगार स्वगावी गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. यासाठी म्हाडा व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली असून तातडीने स्पष्टीकरण मागण्यात आले.

म्हाडा कॉलनीच्या बांधकामावर सुमारे ३०० मजूर कार्यरत आहे. कोरोनाचा वाढता फैलाव बघता मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने येथे विशेष चाचणी शिबीर घेण्यात आले होते. यात सहा कामगार पॉझिटिव्ह निघाले आणि सहा जणांना पुन्हा चाचणी करण्यास सांगण्यात आले होते. पॉझिटिव्ह आलेल्याना गृहविलगीकरणाचा सल्ला देण्यात आला होता.

मात्र हे रुग्ण कामगार वसाहतीत खुलेआम फिरत असल्याची, मास्कचा वापर करीत नसल्याची आणि कॉटन मार्केट, गणेश पेठ, गुजरवाडी या भागात खरेदीसाठी फिरत असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांना फोनद्वारे मिळाली. माहिती मिळताच त्यांनी सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. पोवाने, उपद्रव शोध पथक आणि मनपाच्या आर.आर.टी. पथकासह कामगार वसाहत गाठली. तेथील दृश्य धक्कादायक होते. बहुतांश कामगार मास्कविना होते. व्यवस्थापनाचे लोक उपस्थित नव्हते. त्यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली. मात्र लेबर कॉन्ट्रॅक्टरवर जबाबदारी ढकलत त्याचा फोन क्रमांक देऊन ते मोकळे झाले.

लेबर कॉन्ट्रॅक्टरला फोन लावून बोलावण्यास महापौरांनी सांगितले. त्याने १५ मिनिटात पोहचतो असे सांगितले आणि फोन बंद करून ठेवला. यानंतर अधिकाऱ्यांनी कामगार वसाहतीचा दौरा केला. मात्र तेथे सहा पैकी केवळ दोनच पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची धक्कादायक बाब समोर आली. ते अन्य कामगारांसोबत मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशातील आपल्या स्वगावी गेल्याची बाब समोर आली. ज्या रेल्वेने त्यांनी प्रवास केला असेल किंवा ज्या गावात ते गेले असतील तेथे सुपर स्प्रेडरचे काम करतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

म्हाडा व्यवस्थापनाच्या या हलगर्जीपणाबद्दल महापौरांच्या निर्देशानुसार व्यवस्थापनाला नोटीस बजावून उद्यापर्यंत सविस्तर माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर दंडात्मक कारवाई करण्याचे आणि पोलिस कारवाई करण्याचेही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *