- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : ४२ आघाड्या प्रचारात सक्रिय; १० तारखेच्या जाहीरनाम्यासाठी भाजपचे शहरवासीयांना आवाहन

नागपूर समाचार : भारतीय जनता पक्षाच्या ४२ आघाड्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज भाजपच्या नागपूर कार्यालयात पार पडली. निवडणूक प्रचारासाठी आता केवळ १० दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने सर्व आघाड्यांनी आक्रमकपणे मैदानात उतरून जनसंपर्क करावा आणि शहराच्या विकासासाठी जनतेकडून थेट सूचना संकलित कराव्यात, असे नियोजन या बैठकीत करण्यात आले. शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी यावेळी सर्व आघाड्यांचे अध्यक्ष व महामंत्र्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सर्वांनी ज्या स्थानावर ते निवास करतात त्या ठिकाणी पक्षाचा प्रचार करावा.

यामध्ये प्रामुख्याने व्यापारी आघाडीने सर्व व्यावसायिकांशी संपर्क साधावा, सी.ए आघाडीने त्यांच्या ग्राहकांच्या माध्यमातून प्रचार करावा, फार्मसिस्ट आघाडीने त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचावे आणि दिव्यांग आघाडीने दिव्यांग लोकांसाठी पक्षाने केलेल्या कार्याची माहिती जनतेला द्यावी,अशा सूचना देण्यात आल्या.​ भारतीय जनता पक्ष आपल्या जाहीरनाम्यासाठी सध्या जनतेकडून थेट सूचना मागवीत असून, निवडणूक प्रचाराचे केवळ १० दिवस उरल्याने सर्व कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी कामाला लागले आहेत. या ४२ आघाड्यांच्या माध्यमातून पदाधिकारी प्रत्यक्ष जनतेत जाऊन त्यांच्या सूचना संकलित करतील.

विशेषतःशनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवसांत युवा मोर्चा, महिला मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा आणि अनुसूचित जनजाती आघाडी हे सर्व आघाड्या सक्रिय राहून जनतेच्या सूचना एकत्रित करतील. या चार दिवसांत संपूर्ण शहरातून जवळपास ४० हजार सूचना गोळा करण्याचे नियोजन असून, आलेल्या सर्व महत्त्वपूर्ण सूचनांचा समावेश येत्या १० तारखेला घोषित होणाऱ्या जाहीरनाम्यात करण्यात येईल.

शहराच्या कानाकोपऱ्यातील विविध भागात राहणाऱ्या नागरिकांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून आपल्या सूचना प्रशासना पर्यंत पोहोचवाव्यात, जेणेकरून सूचना फक्त पक्षाच्या न राहता जनतेच्या माध्यमातून असाव्या व आलेल्या या सूचनांचा वापर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी करता येईल, असे आवाहन शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सर्व शहरवासीयांना केले आहे. यावेळी मंचावर जाहीरनामा सहप्रमुख राम मुंजे, शहर महामंत्री श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे संपर्क महामंत्री विष्णू चांगदे उपस्थित होते.