महाज्योती मार्फत जिल्ह्यातील २९ विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण
गोंदिया समाचार : सध्याचे जग हे स्पर्धेचे आहे. या स्पर्धेच्या काळात टिकता यावे यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत टॅबचे मोफत वितरण करण्यात येते. सदर टॅबचा विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमासाठी सदूपयोग करुन आपले भविष्य उज्जवल करावे, असे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर, दिशा गेडाम, लंजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक लंजे व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक किशोर भोयर मंचावर उपस्थित होते.
आमदार श्री. अग्रवाल म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी एक विकसित समाज निर्माण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या प्रेरणेने इतर मागास बहुजन कल्याण विभाग सुरू करण्यात आला असून इतर मागास प्रवर्गातील जे विद्यार्थी गरीब व होतकरू आहेत त्या विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत मोफत देण्यात येणाऱ्या टॅबचा आपल्या अभ्यासक्रमासाठी सदुपयोग करून आपले करिअर घडवून एक विकसित समाज निर्माण करावा असे सांगून ते पुढे म्हणाले, जगातील सर्व प्रकारचे शिक्षण आपण टॅबमार्फत प्राप्त करु शकतो. आज कृत्रिम बुद्धीमत्ता (A. I.) मुळे सुध्दा मोठी क्रांती होत आहे. या टॅबच्या माध्यमातून कृषि क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून आपले जीवन समृद्ध करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक किशोर भोयर यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी सांगितले की, ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या व जे विद्यार्थी मेडिकल, इंजिनियरींग, आयआयटी या उच्च शिक्षणासाठी JEE/NEET/MH-CET ची परीक्षा देत आहेत, परंतू गरीब विद्यार्थी महागडे कोचिंग क्लास लावू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीने ऑनलाईन प्रशिक्षण सुरु केले असून पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्याचा निर्णय घेतला. तसेच यासोबत दररोज 6 GB इंटरनेट डेटा विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येतो. या टॅब मध्ये संबंधित अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर अपलोड केलेले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्रात एक प्रगत समाज निर्माण होईल हा महाज्योतीचा उद्देश आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे-निमसरकर, यांनी आपल्या विचाराच्या कक्षा वृंदावण्याचे काम विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत करावे, यासह सामान्य विज्ञान रोजच्या घडामोडींची माहिती ही घेत राहावी असे मार्गदर्शन केले. सहायक प्राध्यापिका दिशा गेडाम यांनी क्रांतीज्योती सावित्रीआई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या सामाजिक बदलाचे परिणाम सर्व स्तरावर दिसत असून त्यांच्याकडून सदैव प्रेरणा घेत राहावी आणि अभ्यासात कुठेही विद्यार्थ्यांनी मागे पडू नये असे सांगितले. लंजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक लंजे यांनी विद्यार्थ्यांना देण्यात आलेला टॅबचा वापर हा अभ्यासासाठीच करावा यासह विद्यार्थ्यांनी नेहमी विनयशील राहावे असे सांगितले.
याप्रसंगी महाज्योती, नागपूर या संस्थेमार्फत राबविण्यात येणा-या JEE/NEET/MHT-CET २०२५-२७ परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजने अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना टॅब (with 6 GB Deta) आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित समग्र वाडःमय अभ्यासिका मध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समाजकल्याण निरीक्षक स्वाती कापसे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार आशिष जांभूळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंकुश अतकरे, नितीन साळुंखे, देवदास बनकर, महेश चौधरी, अमोल राऊत, लक्ष्मण खेडकर, राजेश मुधोळकर यांचेसह क्रिस्टल व एस-२ कंपनीचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




