- Breaking News, कोविड-19, नागपुर समाचार

नागपुर : महापौरांनी केली झिंगाबाई टाकळी प्राथमिक आरोग्य केन्द्राची आकस्मिक तपासणी

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी झिंगाबाई टाकळी नागरी प्राथमिक आरोग्य केन्द्राची आकस्मिक तपासणी करुन तिथल्या कर्मचा-यांना “कारण दाखवा” नोटीस देण्याचे आदेश वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांना दिले. त्यांचासोबत सत्तापक्ष नेता श्री. संदीप जाधव सुध्दा उपस्थित होते.

महापौरांना माहिती मिळाली होती की हातमोजे (हॅन्डग्लोव्हज) नसल्यामुळे झिंगाबाई टाकळीच्या नागरी प्राथमिक आरोग्य केन्दात कोरोनाची तपासणी दोन दिवसापासून बंद आहे. तसेच काँटेक्ट ट्रेसिंग चे काम सुध्दा बंद आहे.

महापौरांनी व सत्तापक्ष नेता श्री. संदीप जाधव यांनी याची दखल घेवून जेव्हा प्राथमिक आरोग्य केन्द्राची प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीमती वैशाली कासवटे आणि जे.एन.एम.विद्या एंचेलवार यांना याबददल माहिती विचारली तर त्यांनी सांगितले की हातमोजे नसल्यामुळे कोरोनाची आर.टी.पी.सी.आर चाचणी बंद आहे. हातमोजे साठी आरोग्य विभागाला पत्र देण्यात आले आहे. दररोज १०-१५ नागरिकांची कोरोना चाचणी येथे करण्यात येत आहे.

महापौरांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांचे सोबत मोबाईलवरुन याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की १० ते १५ कोरोना चाचणीसाठी हातमोज्यांची आवश्यकता नाही. ही चाचणी पीपीई किट घालून ही करता येते. महापौरांनी दिशाभूल करणा-या प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि जे.एन.एम.वर नाराजी व्यक्त करुन त्यांना ताबडतोब कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश दिले. तसेच काँटेक्ट ट्रेसिंगचे काम युध्द स्तरावर करुन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणामध्ये आणण्यासाठी आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *