जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ग्राम पातळीपर्यंत समन्वय ठेवत दिली गती
नागपूर समाचार : पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. या अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये व ज्यांची मतदार यादीतील नावे चुकली आहेत अशा प्रत्येकाला यात बदल करता यावा यादृष्टीने निवडणूक विभागातर्फे सखोल मतदार पुनरीक्षणाच्या मोहीमेला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गती दिली आहे. दोन आठवड्यांपूर्वी मतदार पडताळणीचे प्रमाण अवघ्या 30 टक्क्यांवर होते ते आता 45 टक्क्यांपर्यंत शहरी भागातील व ग्रामीण भागातील प्रमाण 67 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे.
मतदार पडताळणीची जबाबदारी राष्ट्रीय कर्तव्याचा भाग आहे. या राष्ट्रीय कर्तव्यात मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक, मतदार केंद्र अधिकारी आणि राजकीय पक्षांचे मतदान केंद्र सहाय्यक यांचा समन्वय अधिकाधिक उत्तम ठेवल्यामुळे या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून दोन आठवड्यात यात लक्षनीय वाढ झाल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
सखोल मतदार पुनरीक्षणासाठी मतदान केंद्र अधिकारी, नोंदणी पर्यवेक्षक, राजकीय पक्षांचे मतदान केंद्र सहाय्यक यांचे महत्वाचे योगदान आहे. मतदारांनीही या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूरचे प्रमाण कमी असल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व मतदान केंद्र अधिकाऱ्यांकडून अडचणी समजून घेतल्या. कामगिरी कमी असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
राजकीय पक्षांच्या मतदान केंद्र सहाय्यकांची भूमिका लक्षात घेऊन त्यांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले. सर्वांच्या समन्वयातून ही मोहीम अधिक गतिशील झाली आहे.
नागपूर जिल्ह्यातील प्रगती
🔹 काटोल – 75%
🔹 सावनेर – 68%
🔹 हिंगणा – 53%
🔹 उमरेड – 83%
🔹 कामठी – 56%
🔹 रामटेक – 84%
🔹 दक्षिण-पश्चिम नागपूर – 46.37%
🔹 दक्षिण नागपूर – 42%
🔹 पूर्व नागपूर – 44%
🔹 मध्य नागपूर – 53%
🔹 पश्चिम नागपूर – 41%
🔹 उत्तर नागपूर – 43%
🔹 नागपूर ग्रामीण सरासरी – 67%
🔹 नागपूर शहर सरासरी – 45%




