- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर : तोफा सापडल्या तेथे पोहचले न्यायालय, ‘या’ ऐतिहासिक स्थळाची न्यायमूर्तींकडून पाहणी

नागपूर : शहराच्या मध्यभागी असलेल्या कस्तुरचंद पार्क येथे वर्षभरापूर्वी दोनशे वर्ष जुन्या ब्रिटीशकालीन तोफा सापडल्या होत्या. या पार्कवर इतिहासाची साक्ष देत उभ्या असलेल्या वास्तुचे जतन करण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्या आहेत. असंख्य ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या कस्तुरचंद पार्कचे सौंदर्य प्रदर्शनांमुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वर्षभर सुरू राहणाऱ्या विविध प्रदर्शन, मेळ्यांमुळे मैदानावरील तोफ तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूचे नुकसान होत असल्याच्या वृत्ताची दखल घेत उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. तसेच या पार्कची परिस्थिती सुधारण्यासाठी वेळोवेळी आदेश दिले होते.

मात्र या आदेशांची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. तीन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयीन मित्रांनी कस्तुरचंद पार्कमध्ये मोठे खड्डे पडले असल्याचे छायाचित्र खंडपीठाला दाखवले. ही छायाचित्रे बघून आपण स्वत: भेट देणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानुसार न्या. रवी देशपांडे व न्या. पुष्पा गणेडीवाला यांनी शनिवारी पार्कला भेट देऊन तेथील पाहणी केली. यावेळी पार्कमध्ये नव्याने तयार करण्यात आलेली धावपट्टी काढून टाकण्याची आणि पार्कचे माती टाकून सपाटीकरण करण्याच्या सूचनाही केल्या. धावपट्टीमुळे खेळण्यास अडचणी येतील.

कस्तुरचंद पार्क खेळासाठी महत्त्वाचे आहे. खेळण्यास कोणताही अडथळा नको, असेही ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. न्यायालयीन मित्र अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, ज्येष्ठ विधिज्ञ एस.के. मिश्रा, अ‍ॅड. कौस्तुभ देवगडे, सरकारी वकील दीपक ठाकरे, अ‍ॅड. जेमिनी कासट, हेरिटेज संवर्धन समितीचे अशोक मोखा, यांच्यासह मनपा, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *