

वर्षभर चालणार पूर्णवेळ कामकाज : मुंबईला जाण्याची आता गरज नाही
नागपूर : विधानभवन, नागपूर येथे विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरुपी कक्ष सोमवार 4, जानेवारी रोजी कार्यान्वित होणार आहे. या सचिवालयाचे कामकाज वर्षभर नागपुरातून चालणार आहे. विशेष म्हणजे नागपूर करारानुसार वर्षातील 3 अधिवेशनांपैकी 1 अधिवेशन उपराजधानी नागपुरात दरवर्षी होत असते.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या प्रसंगी मध्यप्रांतातील मराठी भाषिक विदर्भ प्रदेश महाराष्ट्रात सामील झाला. नागपूरला असलेला तेव्हाच्या राजधानीचा दर्जा त्यागून वैदर्भीय जनता महाराष्ट्रात सामील झाली. 28 सप्टेंबर, 1953 रोजी अस्तित्वात आलेल्या नागपूर करारान्वये शासनाचे कार्यस्थान अधिकृत निश्चित कालावधीकरिता नागपूर येथे हलविण्यात येईल आणि दरवर्षी राज्य विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपूर येथे भरविण्यात येईल, असे सुनिश्चित करण्यात आले. अशाप्रकारे भारतातील केवळ महाराष्ट्र व जम्मू काश्मीर या दोन राज्यात विधिमंडळाचे अधिवेशन गेली अनेक वर्षे आयोजित केले जात आहे.
नागपूर करारानुसार 1960 पासून उपराजधानी नागपूरमध्ये महाराष्ट्र विधानमंडळाचे एक अधिवेशन आयोजित केले जाते. फक्त काही अपवाद वगळता नागपूर कराराव्दारे अंमलात आणली गेलेली ही व्यवस्था अव्याहतपणे सुरू आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर नागपूर येथे घेण्यात न आलेल्या अधिवेशनांची संख्या 5 आहे. गेल्या 60 वर्षात आजपर्यंत नागपूर येथील अधिवेशने विदर्भातील प्रश्नांबरोबरच राज्यातील महत्त्वाचे प्रश्न, ध्येयधोरणे, संमत कायदे यादृष्टीने नेहमीच महत्त्वपूर्ण आणि वैशिष्टयपूर्ण ठरली आहेत.
नागपुरात विधानमंडळाचा कायमस्वरूपी कक्ष सुरू व्हावा, तसेच लोकसभेतील ब्युरो ऑफ पार्लमेंटरी स्टडीज अँड ट्रेनिंग (इझडढ) चे एक केंद्र कार्यान्वित व्हावे, अशी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची संकल्पना आहे. त्यानुसार उद्या, 4 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री अनिल परब तसेच विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोर्हे या मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत हा कार्यक्रम दुपारी 1.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
विधानभवन, नागपूर येथे महाराष्ट्र विधानमंडळाच्या नव्याने कार्यान्वीत करण्यात येत असलेल्या या कक्षामध्ये 2 उप सचिव, 2 अवर सचिव, 2 कक्ष अधिकारी, 2 सहायक कक्ष अधिकारी, 4 लिपिक-टंकलेखक आणि 4 शिपाई असा अधिकारी / कर्मचारी वर्ग असेल. यापुढील काळात विधानभवन, नागपूर येथे विधिमंडळ समित्यांच्या बैठका देखील आयोजित केल्या जातील. त्याचप्रमाणे या विभागातील दोन्ही सभागृहांच्या सन्माननीय सदस्यांना अधिवेशनाअगोदर प्रश्न, लक्षवेधी येथे दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी विधानभवन नागपूर येथे अशाप्रकारे कायमस्वरुपी कक्ष सुरू करण्यासंदर्भात मागणी करून पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांची संकल्पना आता प्रत्यक्षात येत असल्याने त्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.