- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर : नागपूर ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टर प्रायव्हेट लिमिटेड (एन.ए.ई.सी)च्या सामाईक सुविधा केंद्राचे भूमिपूजन संपन्न

इलेक्ट्रिक, एलएनजी आणि सीएनजी संचालित वाहने भारतीय ऑटोमोबाईल सेक्टरचे भविष्य ठरणार – नितीन गडकरी

नागपुर : पेट्रोकेमिकल्स आणि इंधन तेलाच्या जवळपास 8 लाख कोटी रुपयांच्या आयातीवर होणारा खर्च वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक, एलएनजी आणि सीनजी संचालित वाहन ही भारतीय ऑटोमोबाईल सेक्टर चे भविष्य ठरणार असल्याच प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केलं. हिंगणा येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरात नागपूर ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टर प्रायव्हेट लिमिटेड (एन.ए.ई.सी.) या केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या क्लस्टर विकास कार्यक्रमाअंतर्गत स्थापन झालेल्या सामाईक सुविधा केंद्र अर्थात कॉमन फॅसिलिटी सेंटरचा (सी.एफ.सी. )भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, हिंगण्याचे आमदार समीर मेघे, राज्याच्या उद्योग विभागाचे संयुक्त संचालक अशोक धर्माधिकारी, एम. एस. एम .ई. विकास संस्था नागपूरचे संचालक डॉ. पी.एम. पार्लेवार उपस्थित होते.

ज्याप्रमाणात गत सात वर्षात मिहानचा औद्योगिक विकास झाला, कळमेश्वर, बुटीबोरी आणि हिंगणा येथील औद्योगिक वसाहतीचा विकास त्या प्रमाणात झाला नाही . या क्षेत्रात नागपूर ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टर अंतर्गत ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील उद्योग आणि त्यांच्या स्पेअर पार्ट अर्थात सुटे भाग बनवणारे उद्योग हे एम. एस. एम. ई. ने इथल्या उद्योजकां सोबत संपर्क साधून स्थापन करावेत . इलेक्ट्रीक वाहनामुळे वाहतूक खर्चाचे अर्थशास्त्रच बदलत असल्याने अशा वाहनांचे सुटे पार्ट हे भारतात शंभर टक्के बनले पाहिजे. आयात कमी होऊन निर्यात वाढून भारताला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवण्यासाठी सर्व उद्योगांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी केलं.

नागपूरमध्ये एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग हब होण्याची सुद्धा क्षमता आहे असे सांगून टाल येथील कंपनीत एअरबस आणि बोईंग विमानाच्या दुरुस्तीच काम चालू आहे .2022 पर्यंत फाल्कन विमान सुद्धा नागपुरात बनतील. या फाल्कन विमानाला फ्लोटींग लावून त्याचे सी-प्लॅनमध्ये रूपांतरण करून सी-प्लेन सुविधा आता दृष्टीक्षेपात असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

नागपूर आणि अमरावती वर्धा यासारखे सॅटॅलाइट टाऊन मेट्रो नेटवर्क द्वारे जोडण्यासाठी मंजुर करण्यात आलेली ब्रॉडगेज मेट्रो सेवा अत्याधुनिक स्वरूपाची राहणार असून. या सेवेमध्ये लागणारे रोलिंग स्टॉक अर्थात मेट्रोचे डबे हे वर्धा येथे तयार होतील. अशा मेट्रोच्या कोचेसची मालकीही ट्रॅव्हल्स कंपन्यांनी घ्यावी आणि त्यातून स्वतः उत्पन्न कमवावे असा प्रस्ताव सुद्धा गडकरी यांनी विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशन पुढे मांडला.

खासदार कृपाल तुमाने यांनी औद्योगिक क्षेत्रात पेटंट रजिस्टरचे क्षेत्रीय कार्यालय तसेच नाबार्ड अर्थात राष्ट्रीय ग्रामिण विकास बँकेचे क्षेत्रीय कार्यालय नागपुरात असावे असं सुचविल तसेच हिंग़णा औद्योगिक क्षेत्रात रोजगारामध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे असे देखील त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.

या क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत 25 कंपन्यांचे एक स्पेशल पर्पज व्हेईकल तयार झाले असून या सी.एफ.सी. मुळे रोजगार निर्मितीमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा एम.एस. एम .ई. विकास संस्था नागपूरचे संचालक डॉ. पी.एम. पार्लेवार यांनी व्यक्त केली नागपूर मध्ये स्थापन होणार हे चौथे क्लस्टर असून यापूर्वी गारमेंट ,राईस आणि अगरबत्ती क्लस्टर विदर्भात स्थापन झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाला बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशन, महाराष्ट्र इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी, उद्योजक तसेच निलडोह ग्रामपंचायतीचे नागरिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *