नागपूर समाचार : नागपूर महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज हैदराबाद हाऊस, नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवालयात करण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ व बोधचिन्हाचे रचनाकार विवेक रानडे यावेळी उपस्थित होते.
नागपूर शहरातील नागरिकांच्या सेवेत ‘पौर जन हिताय’ हे ब्रिदवाक्य घेऊन अहोरात्र काम करणाऱ्या नागपूर महापालिकेची स्थापना २ मार्च १९५१ रोजी झाली. महापालिकेच्या अमृत महोत्सव वर्षाला २ मार्च २०२५ पासून सुरुवात झाली आहे. या औचित्याने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते, बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले असून महापालिकेच्या सर्व पत्रव्यवहार व मनपाच्या इतर प्रशासकीय कामकाजामध्ये याचा रितसरपणे उपयोग करण्यात येणार आहे.