- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : हुडकेश्वर, नरसाळाचे भूमापन नकाशे तयार होणार – आ. चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हा नियोजन समितीतून ५.५० कोटींचा निधी 

नागपुर समाचार : नागपूर महानगर पालिका हद्दीत समाविष्ठ झालेल्या हुडकेश्वर व नरसाळा या गावांचे भूमापन नकाशे तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून ५ कोटी ५० लाखांचा निधी प्रदान करण्यात आला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी पुढाकार घेत प्रशासकीय मान्यता मिळवून दिली. 

कामठी विधानसभा क्षेत्रातील नागपूर शहरालगत असणाऱ्या हुडकेश्वर व नरसाळा या दोन्ही ग्रामपंचायतीचा सामवेश काही वर्षांपूर्वी नागपूर महानगर पालिका हद्दीत करण्यात आला होता. तथापि, या गावांचे भूमापन नकाशे नागरिकांसाठी उपलब्ध नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

भूमापन नकाशे तयार व्हावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती. याची दखल घेत विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा नियोजन समितीमधून भूमापन करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या नागरी दलितेत्तर वस्त्यांमध्ये सुधारणा या शिर्षकांतर्गत भूमापन करण्यासाठी नागपूर महानगर पालिका आयुक्तांना ५ कोटी ५० लाख ३३ हजारांचा निधी देण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. भूमापन नकाशे तयार करण्यासाठी निधी दिल्याबद्दल आ. चंद्रशेखर बावनकुळे व आ. टेकचंद सावरकर यांनी उपमुख्यमंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. 

जिल्हा नियोजन समितीने निधी प्रदान केल्याने हुडकेश्वर व नरसाळा या दोन्ही गावाचे भूमापन होणार आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या मालकी हक्काच्या जागांची इंत्यभूत माहिती उपलब्ध होणार असून नकाशे प्राप्त होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *