- Breaking News, नागपुर समाचार

गरिबी हे एक देशासमोरील आव्हान : नितीन गडकरी

नागपूर : आपल्या देशासमोर गरिबी हे एक आव्हान आहे. या आव्हानाचा सामना करून विजय मिळविण्यासाठी सामाजिक-आर्थिक परिवर्तन करणे आवश्यक आहे. त्यासाठी मागास भागाचा विकास आणि रोजगार निर्मिती हाच मार्ग असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

हिरो एन्टरप्राईजेसतर्फे आयोजित एका परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- कोविड-१९ हे संकट संपूर्ण जगासमोर आहे. या संकटावर सकारात्मकता आणि आत्मविश्वासाने मात करणे शय आहे. यासोबतच आर्थिक संकटाचा सामना करून आम्हाला अर्थव्यवस्थेला पुढे न्यायचे आहे. स्वातंत्र्यापूर्वी व नंतर देशातील जनतेने अनेक नैसर्गिक व अनैसर्गिक संकटांचा यशस्वी सामना केला आहे. तीनदा चीन व पाकिस्थानशी युध्द झाले आहे. नक्षलवाद, दहशतवादाचा सामना आपण केला आहे. यातूनही विजयी होऊन आपण पुढे निघालो. कोविड-१९ या संकटावरही मात करून आपण विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यत केला.

मागास भागाचा विकास आणि शेतकर्‍याचा विकास करू शकलो तर आमचा समाजाला फायदा होईल, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन ही आज देशाची गरज आहे. राष्ट्र पुनर्निर्माणाचा हाच मार्ग आहे. एमएसएमईबद्दल बोलताना ते म्हणाले- एमएसएमईची व्याख्या आम्ही बदलून टाकली. अनेक बदल केले. सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांच्या उलाढालीची मर्यादा वाढविली.

बँक, आयकर, जीएसटी रेकॉर्ड चांगल्या असलेल्या उद्योगांना भांडवल उभे करण्यास मदत करीत आहोत. अनेक चांगले निर्णय घेतले. या सर्व निर्णयांचा उद्योगांना फायदा होणार आहे. शेवटी आयात कमी करून निर्यात वाढविणे आवश्यक आहे. निर्यात वाढविण्यासाठी उत्पादन खर्चात बचत, वाहतूक खर्च, व अन्य सर्वच खर्चात बचत केली तरच आपण निर्यात करू शकणार आहोत. निर्यात वाढली म्हणजे रोजगार निर्मिती होईल व गरिबीवर नियंत्रण करणे शय होईल.

तसेच सार्वजनिक वाहतूक व मालवाहतूक क्षेत्रात जैविक इंधनाचा वापर वाढला पाहिजे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- आज ७ लाख कोटींचे पेट्रोल आयात करावे लागते. जैविक इंधन निर्मितीसाठी विविध प्रक़ारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याद्वारे जैविक इंधनाची निर्मिती होणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणावे लागणार आहे. रस्ते बांधकाम क्षेत्रासाठी निधीची कमी नाही. निधी आम्ही उभा़रू. पण लहान व्यवसाय करणारे उद्योग आहेत, त्यांना कर्ज पुरवठ्यासाठी सामाजिक सूक्ष्म वित्तीय संस्थांची निर्मिती आवश्यक आहे. त्यामुळे लहान उद्योग सुरु होतील व रोजगार निर्मिती होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *