- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या करुणा त्रिपदी गायनाने सभागृह भारावले 

लहानग्यांच्या ढोल-ताशा वादनाने सभागृह स्तंभित; बालदोस्तांना फेटे बांधणीसाठी ५१ हजारांची भेट

नागपूर समाचार : श्री गुरुमंदिर परिवार आणि छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपू च्या वतीने शिव जयंती (तिथी नुसार) व संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बीज या मंगल पर्वावर परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी रचित करुणा त्रिपदीचे विविध शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी सामूहिक गायन केले तेव्‍हा रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृह भारावून गेला. सकाळी आठ वाजेदरम्‍यान सुरेश भट सभागृह विद्यार्थ्‍यांच्‍या आगमनाने फुलून गेले होते. त्यांचे अनुशासित आणि तालबद्ध सामूहिक करुणा त्रिपदी गायन आणि त्यानंतर नवयुग शाळेच्या बालदोस्तांच्या ढोल-ताशा वादनाने काहीवेळासाठी सभागृह स्तंभित झाले.

या उपक्रमाचे प्रेरणास्थान सदगुरुदास महाराज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पत्रभेट परिवाराचे संयोजक अजेय व रसिका देशमुख यांची यावेळी प्रामुख उपस्थिती होती. उपक्रमाच्या प्रारंभी नितीन गडकरी आणि सदगुरुदास महाराज यांच्या उपस्थितीत हिंदू मुलींच्या शाळेतील विद्याथींनींनी सामूहिक प्रार्थना सादर केली. त्यानंतर नितीन गडकरी यांनी या सभागृहाचा वापर संस्कार आणि प्रबोधनासाठी व्हावा, यासाठी आगामी काळात जुन्या आणि नव्या संस्कारक्षम चित्रपटांचे प्रदर्शन या सभागृहात केले जावे, अशी इच्छा व्यक्त केली. तसेच, बाबासाहेब पुरंदरे आणि विजयराव देशमुख (सदगुरुदास महाराज) यांनी इतिहास, संस्कृती आणि वारसा समजावून देण्यासाठी जी व्याख्याने दिलीत, त्‍यांचा ठसा आजही लोकमनावर कायम आहे. नव्या काळातील मुलांच्‍या जीवनात परिवर्तन घडवण्‍यासाठी असे उपक्रम आयोजि‍त केले जावेत, असे गडकरी म्‍हणाले.

प्रास्ताविकातून धनश्री कारकर यांनी उपक्रमाची माहिती दिली. सद्गुरुदास महाराजांच्या मार्गदर्शनानुसार कोरोना काळानंतर मागील १ वर्षापासून प. पू. विष्णुदास महाराज अध्यात्म साधना नरेंद्रनगर केंद्रातर्फे विविध शाळांमध्ये विद्यार्थी साप्ताहिक करुणात्रिपदीचे गायन सुरू आहे. यातून २० शाळांमधील ५००० विद्यार्थ्‍यांनी करुणा त्रिपदी मुखोद्गत केली असल्याचे त्‍यांनी सांगितले. औपचारिक कार्यक्रमानंतर नवयुग ढोल-ताशा पथकाचे वर्ग १ ते ४ तुकडीतील सदस्य व्यासपीठावर पारंपरिक वेशात आले आणि ढोल वादनाला प्रारंभ केला.

सभागृहातील विद्यार्थ्‍यांनी जय भवानी जय शिवाजी, सदुगुरुनाथ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशा घोषणा देत एकच गलका केला. विशेष म्हणजे या पथकात ४० अंध विद्यार्थ्‍यांचाही समावेश होता. यावेळी धनंजय कारकर यांनी सद्गुरुदास महाराज यांचे तर देवगावकर यांनी अजेय व रसिका देशमुख यांचे शेला, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. देविका मार्डीकर यांच्या समारोपीय गीताने या अभिनव उपक्रमाची सांगता झाली. सभागृहात मोठ्या संख्‍येत विद्यार्थी, शिक्षक आणि पत्रभेट परिवाराचे सदस्य उपस्‍थ‍ित होते.

उपासना म्‍हणजे हातचा एक – सदगुरुदास महाराज

करुणा त्रिपदी पठनानंतर सदुगुरुदास महाराजांनी विद्यार्थ्‍यांना आशीर्वचन दिले. ते म्‍हणाले, जसा हातचा एक घेतल्याशिवाय गणित सुटत नाही तसेच, जीवनात सर्व आकडे असून उपासनेचा हातचा एक आवश्यक असतो. आधुनिक शिक्षणात आध्यात्माचा हातचा एक जोडण्‍याचा हा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी शाळांनी पुढे यावे. आम्ही त्यांना यात मदत करु असे सांगत नवयुग ढोल-ताशा पथकातील बालकांना फेट्यांकरिता ५१ हजार रुपये देण्याची घोषणा केली. भविष्यात इतर शाळा पुढे आल्यास आम्ही त्यांना मदत करु असे आश्वासन दिले.

शिवचरित्राचे संस्‍कार कायम – नितीन गडकरी 

बालपणी सद्गुरूदास महाराजांची (त्यावेळी ते विजयराव देशमुख) शिवचरित्र व्याख्यानमाला सात दिवस न्यू इंग्लिश हायस्कूल महालच्या पटांगणावर ऐकली होती. त्‍यावेळी शिवचरित्राचे मनावर झालेले संस्कार आजही कायम आहेत, असे नितिन गडकरी यावेळी बोलताना म्‍हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *