
डॅा. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रदर्शन व ग.त्र्यं.माडखोलकर प्रकाशन मंचाचे उद्घाटन; वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
वर्धा समाचार : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीत आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथप्रदर्शनीचे आणि ग.त्र्यं.माडखोलकर प्रकाशन मंचाचे साहित्य संमेलनाचे मावळते संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या उद्घाटन पार पडले.
यावेळी आयोजन समितीचे सल्लागार गिरीश गांधी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, डॉ. रविंद्र शोभणे, विलास मानेकर, विसा संघाचे वर्धा शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, प्रा.राजेंद्र मुंढे यांच्यासह माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॅा.सुरज मडावी, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॅा.गजानन कोटेवार, साहित्यिक, प्रकाशक, पुस्तक विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहित्य नगरीत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसाठी 300 दालनांची उभारणी करण्यात आली आहे. त्यात राज्य व राज्यबाहेरील नामवंत प्रकाशक व पुस्तक विकेत्यांच्या दालनांचा समावेश आहे. याशिवाय माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयासह विविध विभागांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाची चार स्वतंत्र दालने असून त्यात आयोगाची पुस्तके, मतदार नोंदणी दालनाचा समावेश आहे.
प्रत्येक साहित्य संमेलनात संमेलन उद्घाटनाच्या दिवशीच ग्रंथ दालनांचे उद्घाटन केले जाते. वर्धा येथे पात्र आदल्या दिवशीच ग्रंथ दालनांचे उद्घाटन होऊन ती वाचकांसाठी खुली करण्याचा नवीन प्रयोग करण्यात आला आहे. वर्धेचे हे भव्य ग्रंथप्रदर्शन साहित्यरसिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास भारत सासणे यांनी व्यक्त केला. वर्धा साहित्य संमेलनात तयार करण्यात आलेला प्रकाशन कट्टा नाविन्यपुर्ण उपक्रम आहे. हा कट्टा वाचन चळवळीला चालना देणारा ठरेल, असे प्रकाशन मंचच्या उद्घाटन प्रसंगी भारत सासणे यांनी सांगितले.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ग.त्र्यं.माडखोलकर प्रकाशन मंचाचे उद्घाटन करण्यात आले. वर्धा साहित्य संमेलनात पहिल्यांदाच पुस्तकांच्या प्रकाशनांसाठी 80 बाय 60 फुटाचा स्वतंत्र मंडप उभारण्यात आला आहे.