
वर्धा येथे उभारण्यात आलेली राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी सजली
वर्धा समाचार : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने वर्धा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीमध्ये 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. स्वावलंबी शिक्षण मंडळाचे पटांगण त साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून साहित्य नगरी सजली आहे.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन आचार्य विनोबा भावे सभामंडपातील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी, राज्याचे शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्याक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांच्यासह ज्येष्ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, खासदार, जिल्ह्यातील आमदार,तसेच आमदार डॉ. विश्वजीत कदम, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. तत्पूर्वी, सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडी निघणार असून अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
दिवसभर या परिसरात भरगच्च कार्यक्रम होणार असून यात संमेलनाध्यक्षकांचे भाषण, विविध विषयांवरचे परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन, विविध कट्टयांचे उद्घाटन असे कार्यक्रम राहणार आहे. विविध ठिकाणाहून महामंडळाचे पदाधिकारी, साहित्यिक, प्रतिनिधी वर्धेत दाखल झाले आहेत. पुढचे तीन दिवस साहित्य नगरीत साहित्याचा जागर होणार आहे. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष व संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदिप दाते याच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाच्या यशस्वितेसाठी विविध समित्यां कार्यरत आहेत. वर्धेकराचा संमेलनास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.