- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला

कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला

नागपूर समाचार : विद्यार्थ्याना एक नवीन दिशा देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणे, ही काळाची गरज असून त्यादृष्टीने बाल नाट्य परिषद राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार जेष्ठ समाजसेवक अनंतराव धारड यांनी काढले.

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा आणि बाल नाट्य परिषद, नागपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ गिरिषभाऊ गांधी यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी संभाषण आणि कार्यक्रम निवेदन/संचालनाच्या द्विदिवासीय कार्यशाळेचे आयोजन राष्ट्रभाषा प्रचार समिती सभागृहात करण्यात आले होते. अनंतराव घारड यांच्‍या हस्‍ते कार्यशाळेचे उद्घाटन पार पडले. यावेळी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा अध्यक्ष अजय पाटील आणि जेष्ठ संपादक/निवेदक बाळ कुलकर्णी, परिषद कार्याध्यक्ष संजय रहाटे, कार्यशाळा संयोजक रुपाली मोरे, अनिल देव मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

अजय पाटील यांनी अशा उपक्रमांची गरज लक्षात घेता परिषदेच्या उपक्रमांना यापुढेही सहकार्य करण्‍याचे आश्वासन दिले. उद्घाटनानंतर झालेल्‍या पहिल्‍या सत्रांमध्ये जेष्ठ अनुभवी निवेदक बाळ कुलकर्णी व डॉ. कोमल ठाकरे यांनी तर दुसऱ्या दिवशीच्‍या सत्रामध्‍ये प्रकाश एदलाबादकर व श्वेता शेलगावकर यांनी मार्गदर्शन केले. शिबिरार्थीना त्‍यांनी संभाषण आणि निवेदन/संचालन प्रभावी होण्यासाठी आवश्यक त्या टिप्स दिल्या. नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी कार्यशाळेला भेट देऊन मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून साऊथ पॉईंट पब्लिक स्कुलच्या प्राचार्या मृणालीनी दस्तुरे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते सहभागी शिबिरार्थीना प्रमाणपत्र देण्यात आले. परिषदेचे मार्गदर्शक डॉ गिरीश गांधी यांनीही कार्यशाळेला भेट देऊन विद्यार्थ्याच्या मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करून परिषदेच्या उपक्रमाचे कौतुक केले. संपूर्ण कार्यशाळेचे संचालन अनिल देव यांनी केले तर प्रास्ताविक रुपाली मोरे यांनी व आभार प्रदर्शन संजय रहाटे यांनी केले. यावेळी परिषदेचे निलेश खांडेकर, रोशन नंदवंशी, विलास कुबडे, अमोल निंबार्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *