- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : ‘महापौर स्वररत्न’ स्पर्धेच्या ऑडिशनला सुरूवात

गांधीबाग उद्यानात महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर समाचार : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्यावतीने हिंदी-मराठी गीतांची बहारदार गायन स्पर्धा ‘महापौर स्वररत्न’चे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेच्या ऑडिशनला सोमवारी (ता.२०) सुरूवात झाली. गांधीबाग उद्यान येथे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ झाला. यावेळी क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, नगरसेवक प्रमोद चिखले, लकी खान उपस्थित होते.

वयोगट ७ ते १७ वर्षे, १८ ते ४० वर्षे आणि ४१ वर्षे व पुढील वयोगटासाठी ही स्पर्धा आहे. गांधीबाग उद्यानात स्पर्धेचे महापौरांनी उद्घाटन केले. शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रामध्ये २० ते २५ डिसेंबर दरम्यान ऑडिशन होणार आहे.

यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘महापौर स्वररत्न अवार्ड’ स्पर्धा घेण्यात यावी अशी संकल्पना नगरसेवक नागेश सहारे यांच्याद्वारे मांडण्यात आली होती. ही संकल्पना विचारात घेउन क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती प्रमोद तभाने आणि माजी सभापती प्रमोद चिखले यांनी पुढाकार घेउन यासंबंधी कार्यवाही पूर्ण केली. त्याचे फलीत आज स्पर्धेचे आयोजन होत आहे. नागपूर शहरातील विविध वयोगटातील नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सर्वच वयोगटासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून आपल्या शहरातील अनेक प्रतिभावंत कलावंत पुढे येऊन ते भविष्यात आपले शहर आणि देशाचे नाव लौकीक करतील, असा विश्वासही महापौरांनी यावेळी व्यक्त केला.

स्पर्धेसाठी सहाही विधानसभा क्षेत्रामध्ये ऑडिशन फेरी घेण्यात येणार आहे. गांधीबाग उद्यानात २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजे पासून ऑडिशन होणार आहे. या स्पर्धेत अकोला, अमरावती, वर्धा, पुलगाव, भंडारा येथून आलेल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला. परीक्षक म्हणून सारंग जोशी, नंदिनी घटाटे, भूषण जाधव, अविनाश सोनुले उपस्थित होते.

स्पर्धेची अंतिम फेरी ४ जानेवारी २०२२ रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये होईल. अंतिम स्पर्धेमध्ये इशा डेअरीचे प्रमुख कलाकार उपस्थित राहतील. या स्पर्धेचे विजेत्यांना प्रथम पुरस्कार २१००० रुपये, द्वितीय पुरस्कार ११००० रुपये आणि तृतीय पुरस्कार ७००० रुपये देण्यात येईल. लकी म्यूझिकल इंटरटेन्मेंटच्या माध्यमाने स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धा नि:शुल्क असून यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेण्यात येणार नाही. नागपूर शहरातील ३५ तज्ज्ञ या कार्यक्रमात सहभाग घेतील. अधिक माहितीसाठी लकी खान (८८८८८९९३२१) यांच्याशी संपर्क साधा.

Leave a Reply

Your email address will not be published.