जवाहर गुरुकुल विद्यालय, नंदनवन येथे शैक्षणिक व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर समाचार : राष्ट्रीय शिक्षण दिवस व बालक दिवसाचे औचित्य साधून जवाहर गुरुकुल विद्यालयात ममता–HIMC, प्रोजेक्ट जागृतीच्या वतीने एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजात शिक्षणाचे महत्त्व आणि बालविवाह प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता प्रतिमेचे पूजन तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल राठोड हे उपस्थित होते. ममता–HIMC च्या राज्य समन्वयिका सौ.पल्लवी भांडारकर व विशेष मार्गदर्शिका योगिता गणवीर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण व बालविवाह प्रतिबंध विषयावरील एक प्रभावी व्हिडिओ क्लिप दाखवून करण्यात आली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर संदेश देणारी ही क्लिप अतिशय उपयुक्त ठरली. यानंतर पल्लवी भांडारकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे मूल्य, बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम व सामाजिक जागरूकतेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
त्यानंतर सौ. योगिता गणवीर यांनी पोस्टरच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंध, शिक्षणातील समानता आणि विशेषतः मुलींच्या शिक्षणाची गरज यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांकडून एका कॉमिक नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. शिक्षण व बालविवाह या प्रमुख विषयांवर आधारित या नाटकात समुदायातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना स्कूल बॅग व जोमेट्री बॉक्स वाटप करून गौरविण्यात आले. शेवटी मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापक अनिल राठोड यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि ममता–HIMC संस्थेच्या उपक्रमाचे मनःपूर्वक आभार मानले. “भविष्यातही असेच उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व आयोजन योगेश राठोड व मंजुषा नासरे यांनी केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेत सकारात्मक प्रतिसाद नोंदविला.




