
नागपूर, ता. १० : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार क्रीडा महोत्सवाचे चवथ्यांदा नागपूर शहरात आयोजन करण्यात येत आहे. खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत लवकरच शहरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी (ता.१०) सीताबर्डी येथील ग्लोकल मॉल येथे नागपूर शहराचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीचे नागपूर शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार नागो गाणार, मनपाचे सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, खासदार क्रीडा महोत्सव समितीचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील आणि देशात आदर्श ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे हे चवथे वर्ष आहे. ना. नितीन गडकरी यांच्या या अभिनव संकल्पनेमुळे नागपूर शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव लौकीक करणारे अनेक दर्जेदार खेळाडू नागपूर शहराला मिळाले. क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धिबळ, मुष्टीयोद्धा, शरीरसौष्ठव, जलतरण, सायकलिंग अशा अनेक प्रकारच्या खेळांमध्ये नागपुरातील खेळाडूंनी यश संपादन केले आहेत. मोठ्या स्तरावर जाउन यश संपादन करणारे हे खेळाडू शहरातील गल्लीबोळात राहणा-या, मैदानात खेळणा-या अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहेत. एकूणच नागपूर शहरात क्रीडा विषयक वातावरण निर्माण करीत शहरातील खेळाडू आणि मैदानांचा विकास या महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे.
मागील सलग तीन खासदार क्रीडा महोत्सवांच्या यशस्वीतेमध्ये खासदार क्रीडा महोत्सव समितीचे मोठे योगदान आहे. समितीमध्ये संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांच्यासह पीयूष आंबुलकर, नागेश सहारे, पद्माकर चारमोडे, डॉ. संभाजी भोसले, डॉ. विवेक अवसरे, सचिन देशमुख, अशफाक शेख, अमित संपत, सतिश वडे, सचिन माथने, सुनिल मानेकर, लक्ष्मीकांत किरपाने, आशिष मुकीम यांचा समावेश आहे.