- Breaking News, नागपुर समाचार, मनपा, स्वास्थ 

नागपूर समाचार : नागपूर विद्यापीठाच्या इमारतीत मनपाचे अत्याधुनिक कोव्हिड हॉस्पीटल सज्ज

महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली पाहणी : ‘ओमायक्रॉन’च्या संभाव्य धोक्यात ठरणार उपयुक्त

नागपूर, ता. ४ : कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ या नव्या व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने आरोग्य सुविधा बळकट करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कोरोनाच्या संभाव्य धोक्यामध्ये प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर योग्य उपचार मिळावे यासाठी मनपातर्फे आरोग्यविषय सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर वि‌‌द्यापीठाच्या श्री जमनालाल बजाज प्रशासकीय इमारतीमध्ये मनपाचे अत्याधुनिक १९९ बेड्सचे कोव्हिड हॉस्पीटल उभारण्यात आले असून हे हॉस्पीटल संभाव्य धोक्यामध्ये उपचारासाठी सज्ज झाले आहे. मनपाच्या या कोव्हिड हॉस्पीटलची शुक्रवारी (ता.३) महापौर दयाशंकर तिवारी यांनी पाहणी केली. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू संजय दुधे, मनपाचे उपायुक्त मिलींद मेश्राम, वै‌द्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, डॉ.शुभम मनगटे, श्री. दहिकर आदी उपस्थित होते.

विद्यापीठातील कोव्हिड हॉस्पीटलमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालन करणाऱ्या आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्थानतर्फे सर्व सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची व्यवस्था मनपातर्फे करण्यात येईल. औषधालय (फार्मसी), पेंट्री आदी व्यवस्था सुद्धा या कोव्हिड हॉस्पीटलमध्ये असेल. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या माळ्यावर हे हॉस्पीटल असून येथे लिफ्टची सोय आहे. हॉस्पीटलमध्ये एकूण १९९ बेड्स असून यामध्ये नवजात शिशू, १५ वर्षापर्यंतची मुले आणि इतर अन्य नागरिकांसाठी येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. नवजात शिशूंसाठी २० बेड्स पीआयसीयू चे तर १५ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ३० बेड्स पीआयसीयू चे असतील. ५० बेड्सचे हे ऑक्सिजनचे व अन्य बेड्स सामान्य असतील.

लहान मुलांना खेळण्यासाठी वेगळी जागा, मुलांच्या पालकांसाठी प्रतीक्षागृह, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट व अन्य आवश्यक सुरक्षा साहित्यांच्या वापराकरिता स्वतंत्र कक्षाची व्यवस्था या हॉस्पीटलमध्ये करण्यात आलेली आहे. हॉस्पीटलमधील बेड्स हे अत्याधुनिक असून विजेव आधारित असल्याने रुग्णाची हालचाल करण्यास ते सोपे जाणार आहे. वि‌द्यापीठ परिसरात हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. याशिवाय ९० ऑक्सिजन सिलींडरची स्वतंत्र व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. पहिल्या माळ्यावर रिशेप्शन काउंटरवर रुग्णाची नोंद झाल्यानंतर त्याची तपासणी केली जाईल. त्यानंतर रुग्णावर आवश्यक पुढील करण्यात येईल. विशेष म्हणजे, विद्यापीठाच्या इमारतीच्या मागील बाजूने सुद्धा प्रवेश व बाहेर जाणे शक्य असल्याने या कोव्हिड हॉस्पीटलमुळे नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय कामामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होऊ शकणार नाही.

मनपाद्वारे निर्मित कोव्हिड हॉस्पीटलच्या पाहणी दरम्यान महापौर दयाशंकर तिवारी यांनी वि‌द्यापीठ प्रशासनाचे आभार मानले. कोरोनाच्या संकटात शहरवासीयांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी वि‌द्यापीठाने त्यांच्या इमारतीतील तील मजले देणे ही बाब राष्ट्रसंतांचा मानव सेवा या संदेशाचे पालन करण्याचे द्योतक आहे, असेही ते म्हणाले. कोरोनाची यापूर्वीची संभाव्य लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे पुढे येताच मनपाद्वारे विद्यापीठात कोव्हिड हॉस्पीटलची निर्मिती करण्याची संकल्पना पुढे आली. सर्व प्रक्रियेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी उत्तम सहकार्य केले. या हॉस्पीटलचे कार्य सुरूच होते. कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ या नवीन व्हेरियंटचा शिकराव होत असल्याने संभाव्य धोका लक्षात घेता हॉस्पीटलचे काम त्वरीत पूर्ण करण्यात आले आहे. हॉस्पीटलच्या निर्मितीसाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालन करणाऱ्या आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्थानद्वारे मनपाला मोठे सहकार्य मिळाले आहे.

आज नागपूर महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ४५० बेड्सची व्यवस्था उपलब्ध आहे. याशिवाय शहरातील शासकीय वै‌द्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि एम्स येथेही रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. मेयो, मेडिकल, एम्स व मनपाचे ४५० बेड्सची व्यवस्था अपुरी लागल्याच्या स्थितीमध्ये विद्यापीठातील कोव्हिड हॉस्पीटलमधील व्यवस्था खुली करण्यात येईल, असेही महापौरांनी सांगितले.

कोव्हिडचा संभाव्य धोका थोपविणे हे नागरिक म्हणून आपल्या हातात आहे. सुरक्षेच्या सर्व साहित्यांचा वापर आणि लसीकरणाचे दोन्ही डोज घेणे ही आपली जबाबदारी आपल्या शहराला संभाव्य धोक्यापासून दूर ठेवू शकणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता धैर्याने व जबाबदारीने सतर्क राहून या परिस्थितीचा सामना करावा, असे आवाहनही महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *