- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : मनपामध्ये संविधान दिवस संपन्न

संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन

नागपूर समाचार : आपल्या भारतासारख्या विशाल देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध धर्माचे असंख्य लोक राहतात. मात्र देशाबाहेर सर्वांची ओळख ही एक भारतीय म्हणूनच पुढे येते ही अभिमानास्पद बाब आहे. भारतीय लोकशाही जगातील सर्वोत्तम लोकशाही आहे, भारतीय संविधानामुळे आपला देश एकसंघ आहे. संविधानामुळे देशाची एकता एकात्मता व अखंडता टिकून आहे, त्यामूळे संविधानाचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, भारतीय संविधानामुळेच देशात समानता नांदत असल्याचे मनोगत महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केले.

भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी व सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेत दरवर्षी ‘२६ नोव्हेंबर’ हा संविधान दिवस म्हणून पाळण्यात येतो. त्या अनुषंगाने म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये महापौर श्री.दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. त्यानंतर महापौरांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. त्यांच्या पाठोपाठ उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनीसुध्दा संविधान उद्देशिकेचे सामुहिकरित्या वाचन केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. निर्भय जैन, सहाय्यक आयुक्त (साप्रवि) श्री. महेश धामेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, डॉ.विजय जोशी, शिक्षणाधिकारी श्रीमती प्रीति मिश्रीकोटकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेन्द्र उचके, विशेष कार्यासन अधिकारी मदन सुभेदार, शिक्षण विभागाचे सहा. शिक्षणाधिकारी संजय दिघोरे, राजेन्द्र सुके, ग्रंथालय अधिक्षक अल्का गावंडे, सहा.अधीक्षक प्रतिभा सिरीया, राजेश वासनिक यांचेसह बहुसंख्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहा.जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *