भ्रष्ट्राचारमुक्त APMC करण्यासाठी शेतकरी परिवर्तन पॅनलला विजयी करा : चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर समाचार : नागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये भ्रष्ट्राचाराचा बोलबाला असून गाळेवाटप असो की मार्केटमधील विकासकामे, कर्मचा-यांची नियुक्ती असो की शेतक-यांच्या हिताचे प्रश्न असो सर्वच ठिकाणी भ्रष्ट्राचार आहे. मंत्री महोदयांच्या आशीर्वादाने एकच अधिकारी या ठिकाणी वर्षानुवर्षे अधिपत्य गाजवीत असून मागील संचालक मंडळाने अनेक प्रकारचे घोटाळे केल्याचे चौकशी अहवाल सुद्धा शासनाला सादर झाला आहे. बकरामंडी मध्ये कोट्यावधीचा महसूल बुडविल्याचे स्पष्ट झाले आहे.
पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी APMC मधील भ्रष्ट्राचार चव्हाट्यावर आणला असताना अशा भ्रष्ट्राचारी संचालक मंडळाला धडा शिकविण्यासाठी शेतकरी परिवर्तन पॅनलच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आव्हान पूर्व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते शेतकरी परिवर्तन पॅनलच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. शेतकरी परिवर्तन पॅनलच्या वतीने आडतिया व्यापारी मतदार संघातून भूषण क्षीरसागर व भास्कर पराते तर हमाल, मापारी, तोलारी मतदार संघातून पूनम जांगडे निवडणूक लढवीत आहे. त्यांचे निवडणूक चिन्ह “कपाट” आहे.
केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे नेतृत्वात कळमना मार्केटच्या सभोवताली विकासकामे : आ.कृष्णा खोपडे
आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे नेतृत्वात कळमना मार्केटच्या सभोवताली प्रचंड विकासकामे झाली असून त्यात सिमेंट रोडचे बांधकाम, ६४८ कोटींचा पारडी ब्रिज, आता डिप्टी सिग्नल-कळमना मार्केट रेल्वे क्रासिंग वरून ब्रिजच्या कामाला शुरुवात झालेली आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक मोठे रस्ते मार्केटशी जोडल्या जाईल. मात्र सेसच्या स्वरूपात कोट्यावधीचा निधी जमा असून देखील मागील काळात शेतक-यांसाठी कोणतीही उल्लेखनीय सुविधा मागील संचालक मंडळ करू शकले नाही. मी स्वत: 2012 च्या निवडणुकीपासून या संचालक मंडळाचे भ्रष्ट्राचाराचे पुरावे गोळा केले. बकरामंडी व मार्केटच्या 100 कोटीच्या वर विकासकामाचे अनेक टुकडे करून निविदा न काढता 3-3 लाख प्रमाणे कंत्राट आपल्या मर्जीतल्या कंत्राटदारांना देण्याचे काम मागील सत्ताधा-यांनी केले. कोट्यावधी रुपयाचा शासकीय महसूल बुडविण्याचे काम देखील यांचेच काळात झाले. त्यामुळे अशा भ्रष्ट्राचारी सत्ताधा-यांना परतीचा मार्ग दाखविणे आवश्यक आहे.
अहमद शेख व सेनाड यांच्या उमेदवारीवर मा.उच्च न्यायालयाची टांगती तलवार
अहमद शेख व अतुल सेनाड या दोन उमेदवारांचा मार्केटमध्ये भ्रष्ट्राचारमध्ये समावेश असल्याचे पुरावे सादर करून यांचे उमेदवारीवर आक्षेप भास्कर पराते व राकेश भावलकर यांनी केले होता. मात्र निवडणूक अधिका-यांनी आक्षेप खारीज केल्यावर मा.उच्च न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. आता 21 ऑक्टो. रोजी अंतिम सुवणी होणार आहे.
भा.ज.प. नेते अशोक गोयल यांचे कळमना मार्केट येथील गोडाऊनमध्ये या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पूर्व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. उदघाटनप्रसंगी आमदार गिरीश व्यास, विकास कुंभारे, टेकचंद सावरकर, मोहन मते, नगरसेवक बाल्या बोरकर, प्रदीप पोहाणे, विक्की कुकरेजा व्यापारी वर्गातून पुंडलिकराव बोलधन, ओंकार गुलवाडे, मेघराज मैनानी, वसंतराव पोहाणे, संजय वाधवानी, अमोल गुलवाडे, मोहन गावंडे, रामावतार अग्रवाल, राजू उमाटे, राधावल्लभ पुरोहीत, इलाही बक्श, सुरेश बारई, अशोक शनिवारे, राजू लारोकर व अनेक व्यापारी उपस्थित होते.