- मनपा

शहरात विविध ठिकाणी ‘ऑक्सिजन झोन’ ही काळाची गरज : महापौर आसीनगर झोनमधील बुद्ध पार्कमध्ये वृक्षारोपण : ३०० झाडे लावणार

नागपूर, ता. ४ : कोरोना महामारी या जगाला खूप काही शिकवून गेली. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा पडला. त्यातून आपण खूप काही शिकलो. शहरात नैसर्गिक ऑक्सिजनची मात्रा वाढविण्याचा आम्ही संकल्प केला आणि त्यातूनच ‘ऑक्सिजन झोन’ची संकल्पना पुढे आली. शहरातील विविध भागातील खुल्या मैदानांवर किमान २५० झाडे लावून ऑक्सिजन पार्क उभारण्याच्या संकल्पनेला सर्वपक्षीय नगरसेवकांनी आणि नागरिकांनी उचलून धरले. ‘ऑक्सिजन झोन’ ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

आसीनगर झोनअंतर्गत असलेल्या बुद्धनगरातील बुद्ध पार्क येथे ‘ऑक्सिजन झोन’ तयार करण्याच्या अनुषंगाने शनिवारी (ता. ४) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आसीनगर झोनच्या सभापती वंदना चांदेकर, नगरसेविका मंगला लांजेवार, नगरसेवक मोहम्मद जमाल, संदीप सहारे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, उद्यान निरिक्षक अनंत नागमोते उपस्थित होते.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बळकट करण्यात येणाऱ्या सेवांची माहिती दिली. शहरातील विविध भागात ७५ हेल्थ पोस्ट तयार करण्याचा मानस असून २ ऑक्टोबर रोजी त्याचा शुभारंभ करण्याचे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. या शहराचे आरोग्य सुदृढ राहण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी बुद्ध पार्कमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित नागरिकांनीही वृक्षारोपण केले. येथे ३०० झाडे लावून ‘ऑक्सिजन पार्क’ तयार करण्यात येत असल्याचे सभापती वंदना चांदेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *