- नागपुर समाचार, मनपा

जोखीम स्वीकारून कर्तव्य बजावणारे शिक्षक मनपाचा अभिमान : महापौर दयाशंकर तिवारी कोरोनाकाळात कार्य करणाऱ्या गांधीबाग झोनमधील शिक्षकांचा

जोखीम स्वीकारून कर्तव्य बजावणारे शिक्षक मनपाचा अभिमान : महापौर दयाशंकर तिवारी

कोरोनाकाळात कार्य करणाऱ्या गांधीबाग झोनमधील शिक्षकांचा

नागपूर, ता. ५ : कोरोनाच्या भीषण संकटात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस यांच्यासोबतच शिक्षकांनीही जीवाची पर्वा न करता जोखीम स्वीकारून कर्तव्य बजावले. ज्यावेळी स्वतःच्या घरचे लोक कोरोनाबधित रुग्णाजवळ जाऊ शकत नव्हते त्यावेळी मनपाच्या शिक्षकांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. संकटाच्या काळात जोखीम स्वीकारून कर्तव्याला प्राधान्य देणारे हे सर्व शिक्षक मनपाचा अभिमान आहेत, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. या शिक्षकांचा शिक्षकदिनी सन्मान करणे ही अभिनव संकल्पना सकारल्याबद्दल गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक यांचे महापौरांनी अभिनंदन सुध्दा केले.

गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक यांच्या संकल्पनेतून रविवारी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने झोनमधील कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांचा महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगरभवन येथे महापौरांच्या अध्यक्षतेत आयोजित सत्कार समारंभाला झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेविका नेहा वाघमारे, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, सहायक आयुक्त अशोक पाटील, झोनल वैद्यकीय अधिकारी डाॅ. ख्वाजा मोईनुद्दीन आदी उपस्थित होते.

 

पुढे बोलताना महापौर म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावात सर्वाधिक संक्रमित रुग्ण गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये होते. गांधीबाग झोन तब्बल तीन महिने रेड झोनमध्ये राहिला. अशा विपरीत परिस्थितीत येथील शिक्षकांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे महत्वाचे कार्य करून संक्रमणाची साखळी खंडित करण्यात महत्वाची भूमिका बजावली. कर्तव्यासोबतच विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात खंड न पडण्याचीही काळजी मनपाच्या शिक्षकांनी घेतली. या सेवाकार्यात मनपाच्या एका शिक्षिकेचा मृत्यू झाला. स्वतःच्या जीवाची बाजी लावून आपल्या शहरातील कोरोना संक्रमणाची स्थिती नियंत्रणात आणण्यामध्ये  मनपाच्या शिक्षकांचे मोठे योगदान आहे व या कार्याचा आम्हाला अभिमान आहे, असेही महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले.

मनपाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधील प्रतिभा हेरून त्यांना पुढील स्पर्धेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविण्यासाठी सक्षम बनवा, असे आवाहनही यावेळी महापौरांनी शिक्षकांना केले.

प्रास्ताविकात झोन सभापती श्रद्धा पाठक यांनी कार्यक्रमाची संकल्पना विषद केली. झोनमधील शिक्षकांनी कोरोना काळासोबतच वर्षभर उत्तम कार्य केले. शाळा आणि कोरोना या दोन्हीच्या जबाबदाऱ्या पेलल्या. दुर्दैवाने मनपाला अलका शिर्के या शिक्षिकेला गमवावे लागले याचे दुःख आहे. झोनमधील शिक्षकांनी केलेल्या कार्याचा शिक्षकदिनी सत्कार व्हावा, या उद्देशाने ही संकल्पना पूर्णत्वास आली, असेही त्या म्हणाल्या.

प्रारंभी महापौर दयाशंकर तिवारी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. गांधीबाग झोनमधील शिक्षिका अलका शिर्के यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यावेळी सर्व मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अलका शिर्के यांच्या कोव्हिड मधील कार्याचा गौरव म्हणून मरणोपरांत त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांचे पती रंगदेव शिर्के यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय संजीवकुमार निकम, सुनिता सुटे, यशोदा मेश्राम, ज्योती वासनिक, अभय मांजरखेडे, आसिया बानो जियाउर्रहमान, स्नेहल पोहरकर, फर्जाना बेगम समीर उर्रहमान, साजीदा बेगम मो. अजहर, गजाला शाहीन मो. अजहर या शिक्षक तथा शिक्षिकांसह मिशन साहसीच्या सुनीता मौंदेकर यांनाही महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

वरील सत्कारमूर्तींसोबत कार्यक्रमाचे संचालन करणाऱ्या पन्नालाल देवडीया शाळेच्या सहायक शिक्षिका शुभांगी पोहरे यांना २०१६ मध्ये राज्य शासन आदर्श पुरस्कार व बँकाक येथे ग्लोबल पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *