
नागपूर, ता. ५ : मागील वर्षी कोरोनाकाळात शस्त्रक्रिया बंद होत्या. डोळ्यांवरील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया वेळेत केली नाही तर दृष्टी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून महापौर नेत्र ज्योती योजना जाहीर करून याअंतर्गत ७५ नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्याचा मानस आहे. यामाध्यमातून सुमारे पाच हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा निर्धार नागपूर महानगरपालिकेने केला असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.
महापौर नेत्रज्योती योजनेअंतर्गत महात्मे नेत्रपेढीच्या सहकार्याने व्हीआयपी मार्गावरील डिक दवाखान्यात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी (ता. ५) करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंचावर धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेविका रूपा राय, उज्ज्वला शर्मा, नगरसेवक संजय बंगाले, निशांत गांधी, माजी आमदार सुधाकरराव देशमुख, डॉ. कीर्तिदा अजमेरा, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, डॉ. आतिक खान उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, आतापर्यंत नऊ नेत्र तपासणी शिबिर पार पडले. यामाध्यमातून ७५० पेक्षा अधिक रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. दृष्टी तिरपे असणाऱ्यांसाठी महापौर दृष्टी सुधार योजना जाहीर करण्यात आली आहे. कुणाच्याही संपर्कातील असा व्यक्ती असेल तर आधार कार्ड आणि रेशन कार्डसह त्यांनी महापौर कार्यालयात संपर्क साधल्यास २० दिवसांत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सभापती सुनील हिरणवार यांनी प्रास्ताविकातून शिबिर आयोजनामागील भूमिका सांगितली. शिबिरात परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. महात्मे नेत्रपेढीच्या चमूने नागरिकांची नेत्रतपासणी केली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विलास भंडारे, अरुण मोगरकर, सोज्ज्वळ दुबे, मुकेश महाडिया, क्रिष्णा पांडे, संजय चितळे, शगुना कुकलोरी, हेमंत सोनकर, अविचवल सिसोदिया, सुनील औरंगाबादकर, प्रकाश दामले, राजेंद्र हिरणवार, अर्चना निलजकर, स्मृती राघव, रेणुका हिरणवार, शिल्पा मोटघरे, रिचा जोशी, पल्लवी भट्टाचार्य, वैदश्री निजसुरे, मिना फुलसुंगे, डॉ. अर्चना पाटील, आरती माहुरकर, उषा भोयर, वर्षा पटवर्धन, आकाश बानीया, मंथन श्रीवास, चिराग मुजुमदार, अक्षय नेवारे, कौशिक हिरणवार आदींनी सहकार्य केले.