
नागपूर, ता. ५ : पैशाअभावी आणि सोयीअभावी कुणीही उपचारापासून वंचित राहू नये यासाठी नागपूर शहरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने नागपूर महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूर शहरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी ठिकठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा आणि आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने गांधीबाग झोनअंतर्गत येणाऱ्या भालदारपुरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गंजीपेठमधील पंचभाई देवस्थानात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, आमदार विकास कुंभारे, नगरसेवक ॲड. संजय बालपांडे, भाजप मध्य नागपूरचे अध्यक्ष किशोर पलांदूरकर, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, झोनल मेडिकल ऑफिसर डॉ. मोईनुद्दीन ख्वाजा, भालदारपुरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शमा मुजावर उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. ७५ हेल्थ पोस्ट हा त्यातीलच एक उपक्रम आहे. प्रत्येक नागरिकाला त्याच्या घराजवळ प्राथमिक उपचार मिळावे, हा त्यामागील हेतू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक यांनी सांगितले, की गांधीबाग झोनमध्ये विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. नुकतेच झोनमधील कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये मोफत आरोग्य तपासणी केली जाते. शहरातील खासगी रुग्णालयांचेही यात सहकार्य घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. शिबिरात सेव्हन स्टार हॉस्पीटल्सच्या डॉक्टर्सने तपासणी केली. डॉ. यादव यांनी नेत्रतपासणी केली. यावेळी डेंग्यूविषयक जनजागृती करण्यात आली. शिबिरात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांची विविध आजारांविषयी तपासणी करण्यात आली. गंभीर आजार असल्यास त्यांना पुढील उपचारांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सुशांत आचार्य, विनायक डेहनकर, ब्रिजभूषण शुक्ला, अनिल मानापुरे, अमोल कोल्हे, शैलेश शुक्ला, रमाकांत गुप्ता, अजय गौर, निरजा पाटील, सरोज तलमले, कल्पना कुंभलकर, अनुप गोमासे, प्रकाश हटवार, सचिन चिमोटे, चंदू गेडाम, सोनू खंते, योगेश राळी, नितेश ठोंबरे, यशवंत ठोंबरे, अंशुल ठोंबर, सैय्यद अशफाक उपस्थित होते.