- नागपुर समाचार, मनपा

ओल्या कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्पाचे महापौरांच्या हस्ते उद्‌घाटन

नागपूर, ता. २८ : सिव्हील लाईनमधील बाजार आणि सोसायट्यांमधून निघणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत बनविणाऱ्या प्रकल्पाचे उद्‌घाटन धरमपेठ झोनअंतर्गत येणाऱ्या महाराजबाग समोरील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यामागील नर्सरी परिसरात महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले.

नगरसेवक किशोर जिचकार यांच्या पुढाकाराने नगरसेवकांच्या वॉर्ड निधीतून हा प्रकल्प उभारण्यात आला. सिव्हील लाईन्स असोशिएशनचे याला सहकार्य लाभले. उद्‌घाटन कार्यक्रमाला महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह झोन सभापती सुनील हिरणवार, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बसपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, नगरसेवक किशोर जिचकार, नगरसेविका प्रगती पाटील, रूपा राय, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, सिव्हील लाईन असोशिएशनच्या अध्यक्षा अनसुया काळे-छाबरानी, सिव्हील लाईन असोशिएशनचे सचिव विक्रम नायडू, कार्यकारी सदस्य दीपा जामवाल, प्रवीण गोलछा, दिशीता जिचकार उपस्थित होते.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी फीत कापून प्रकल्पाची पूजा करीत मशीनची कळ दाबून उद्‌घाटन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी लावण्यात आलेल्या मशीनमध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. त्यातून तयार झालेले खत उद्यानात वापरायचे, असे नियोजित आहे. या प्रकल्पासाठी नगरसेवक किशोर जिचकार, नगरसेविका प्रगती पाटील, रूपा राय यांच्या सहकार्याने सिव्हील लाईन असोशिएशनच्या पुढाकाराने हा प्रकल्प साकारण्यात आला याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन करीत अन्य झोनच्या नगरसेवकांनीही अशा प्रकल्पासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. गोकुळपेठ मार्केटमध्ये एक पीट तयार करून तेथील ओला कचरा त्यात जमा करा आणि तो या प्रकल्पाला द्या, असे निर्देश त्यांनी धरमपेठ झोन सहायक आयुक्तांना दिले. नगरसेवक किशोर जिचकार आणि सामाजिक कार्यकर्ता अनसुया काळे यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांना दिली. सर्व झोनमध्ये अशा प्रकारचा प्रकल्प उभारल्यास परिसरातील ओला कचऱ्यावर तेथेच प्रक्रिया करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *