- नागपुर समाचार, मनपा

लक्षणे ओळखा, वेळीच उपचार घ्या, डेंग्यूवर मात करा ‘आरोग्य संवाद’ फेसबुक लाईव्हमध्ये तज्ज्ञांचे आवाहन

नागपूर, ता. २३ : सध्या सर्वत्र डेंग्यूचा प्रादुर्भाव आहे. डेंग्यू प्रतिबंधासाठी ठराविक औषध व लस सध्या उपलब्ध नाही. मात्र ते वेळीच उपचाराने नियंत्रणात आणता येउ शकते. डासांपासून सुरक्षेसाठी आपण अनेक उपाय करतो मात्र ते पुरेशे नाही. एडिस इजिप्टाय या डासामुळे डेंग्यूचा प्रसार होतो. हा डास दिवसा चावतो, थोड्याशाही पाण्यामध्ये या डासांची पैदास वाढते. त्यामुळे घरातील नियमित स्वच्छता करा सोबतच घराजवळचे परिसरही स्वच्छ ठेवा, कुठेही पाणी जमा राहणार नाही याची काळजी घ्या. डेंग्यू घातक असले तरी ते नियंत्रणात आणता येते. त्यामुळे घाबरून जाउ नका, डेंग्यूची लक्षणे ओळखा, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या व डेंग्यूवर मात करा, असे आवाहन इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सहयोगी प्राध्यापिका कम्यूनिटी मेडिसीन डॉ. सुषमा ठाकरे आणि किंग्जवे हॉस्पिटलच्या इंफेक्सियस डिसिजेस कन्सल्टंट डॉ. अश्विनी तायडे यांनी केले.

            नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आरोग्य संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात मंगळवारी (ता. २४) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सहायोगी प्राध्यापिका कम्यूनिटी मेडिसीन डॉ. सुषमा ठाकरे आणि किंग्जवे हॉस्पिटलच्या इंफेक्सियस डिसिजेस कन्सल्टंट डॉ. अश्विनी तायडे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी तज्ज्ञांनी ‘डेंग्यू ताप : मोठ्या व्यक्तींमधील लक्षणे व उपचार’ या विषयावर संवाद साधला आणि नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. मनपाचा हिवताप व हत्तीरोग विभाग प्रमुख दीपाली नासरे सुध्दा उपस्थित होत्या.  

            जगातील १२९ देशांमध्ये डेंग्यूचे विषाणू पसरले आहेत. आपल्या देशात दक्षिण भारतामध्ये डेंग्यूचे प्रमाण जास्त आहे त्यातुलनेत महाराष्ट्रात रुग्णसंख्या कमी आहे. नागपूर शहरात आजघडीला १४९ डेंग्यूबाधित रुग्णांची नोंद आहे. जुलै ते नोव्हेंबर या महिन्यांमध्ये डेंग्यूचे प्रमाण जास्त असते. डेंग्यू कुणालाही होउ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यूचा डास एकाला चावा घेतल्यानंतर इतर लोकांनाही बाधित करू शकतो. त्यामुळे घरात डेंग्यूबाधित रुग्ण असल्यास रुग्णाची विशेष काळजी घ्यावी. इतरांना संसर्गापासून वाचविण्यासाठी हे महत्वाचे आहे. त्यासाठी नियमित स्वच्छता महत्वाची आहे. एडिस इजिप्टाय या डासाची पैदास कुठेही अगदी १० मिलीलीटरपर्यंत पाणी साचले असेल तरी तिथे अंडी घालते. ही अंडी वर्षभर राहू शकतात. त्यामुळे पाणी साचणारी भांडी, कुंड्या व इतर ठिकाणांना वारंवार स्वच्छ करीत रहा. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा, असे आवाहन डॉ. सुषमा ठाकरे व डॉ. अश्विनी तायडे यांनी केले.

            डेंग्यूच्या सुरूवातीला ताप येतो. हा ताप चार ते पाच दिवस राहतो. तो कमी होत आला ही ‘प्लेटलेट्स’ कमी होण्याचे प्रमाण वाढते. ‘प्लेटलेट्स’ कमी होणे ही धोकादायक बाब आहे. डेंग्यू रुग्णाच्या ‘प्लेटलेट्स’ कमी झाल्यास नातेवाई घाबरून जातात. ही स्थिती धोकादाय असली तरी एकदम घाबरून जायची गरज नसते. अनेकदा रुग्णाला ‘प्लेटलेट्स’ चढविण्याची गरज पडत नाही. औषधांच्या प्रतिसादाने तो पूर्णपणे बरा होउ शकतो. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. डेंग्यूची तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, गोवरसारखे अंगावर पुरळ, अंगदुखी, सांधेदुखी, डोळ्यामध्ये दुखणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे कुठलाही ताप असला तरी तो अंगावर काढू नका. त्वरीत जवळच्या डॉक्टरकडे जाउन डेंग्यूची चाचणी करून घ्या व वेळीच उपचार घ्या, असेही आवाहन डॉ. अश्विनी तायडे व डॉ. सुषमा ठाकरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *